Home Police Nagpur । नागपुरात दरोडेखोर बिल्डरच्या घरात शिरला; पोलिसांच्या तत्परतेमुळे प्राण वाचले

Nagpur । नागपुरात दरोडेखोर बिल्डरच्या घरात शिरला; पोलिसांच्या तत्परतेमुळे प्राण वाचले

नागपूर ब्युरो : नागपुरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी दरोडेखोर शिरल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित बिल्डरच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. हा दरोडेखोर सशस्त्र असल्याने बिल्डरच्या कुटुंबीयांना धोका होता. मात्र, नागपूर पोलिसांची पथके तातडीने घटनास्थळी पोहचली आणि घराला वेढा घातला. घरातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढले आणि आरोपीला पकडले. या थरारक घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित घटना ही नागपूरच्या पिपळा फाटा परिसरात घडली आहे. या परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या घरात एक दरोडखोर घुसला. त्याने राजू वैद्य यांच्या कुटुंबीयांना ओलील धरलं होतं. पोलिसांनी या आरोपीला मोठ्या शिताफीने आणि सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीला अटक केली.

पोलिसांनी अशी केली कारवाई

राजू वैद्य हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी बंदूक आणि चाकू घेऊन घरात शिरला. त्याने घरातील वैद्य कुटुंबियांना ओलीस ठेवले आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी नियोजन केलं. पोलिसांनी घराच्या छपरावरून घरात शिरत या आरोपीला सिनेस्टाइल अटक केली. त्याला गाफील ठेवण्यासाठी आणि त्याने घरच्यांना इजा करू नये यासाठी सुरुवातीला घरातल्यांनी त्याला तीनदा दोन लाख रुपये दिले. या दरम्यान पोलिसांना वेळ मिळाला आणि त्याच्या अंगावर जाळी टाकून अटक केली.

हा आरोपी अडीच वाजता या घरात शिरला आणि सगळं ओलीस जवळपास 3 तास चाललं. यामुळे परिसरातील नागरिकांनी बाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी राबविलेलं हे नाट्य मोठ्या शिताफीने राबविले आणि घरातील सगळ्या जणांची सुखरूप सुटका केली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त राजू पालवे यांनी दिली.