Home कोरोना जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय | नाशिकमध्ये ‘नो शुभमंगल, ओन्ली सावधान’

जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय | नाशिकमध्ये ‘नो शुभमंगल, ओन्ली सावधान’

नाशिक ब्युरो : नाशकात बुधवार पासून विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत शहरातील विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असेल.

शहरात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यानुसार आता शहरात नो शुभमंगल ओन्ली सावधान असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयापर्यंत ही बंदी असणार आहे.

शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट, रुग्ण वाढले

शहरात यापूर्वी 50 लोकांमध्ये सोहळा करायला होती परवानगी होती. पण जसजसे रुग्ण वाढायला लागले तसंतसे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये हॉटस्पॉटची संख्या वाढतीय. याच पार्श्वभूमीवर तथा नाशिककरांच्या गर्दीमुळे लॉकडाऊनची शक्यता बळावली आहे.

बाजारपेठांमध्ये गर्दी, मास्कचा विसर

दुसरीकडे कोरोनाचा उद्रेक झालेला असताना, बाजारपेठांमध्ये गर्दी कायम असल्याचं चित्र आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा गजबजलेल्याच पाहायला मिळत आहे. या गर्दीतील नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचा फज्जा आणि मास्कचा विसर पडल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये सध्या संचारबंदी असली तरी लॉकडाऊन नाहीय. मात्र अशीच गर्दी आणि रुग्णवाढ राहिली तर नाशिककरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट

सहा दिवसात पाचव्यांदा कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या पार गेली आहे. काल (मंगळवार) दिवसभरात 1354 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण, राज्यातील मोठ्या शहरांची आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.