Home Education Nagpur । नागपूर विद्यापीठाची बीएडची परीक्षा ठराविक वेळापत्रकानुसारच होणार

Nagpur । नागपूर विद्यापीठाची बीएडची परीक्षा ठराविक वेळापत्रकानुसारच होणार

नागपूर विद्यापीठ – परीक्षा प्रवेशपत्र व ओळखपत्र जवळ ठेवण्याचे आवाहन

नागपूर ब्युरो : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीएड प्रथम सत्राच्या परीक्षासमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे. लॉकडाऊन असले तरी नागपूर महानगरपालिकेने आता विद्यापीठाला परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार 18 व 20 मार्च रोजी परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे.

‘कोरोना’बाधितांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाने अगोदर 7 मार्च व नंतर 14 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयांचे ‘ऑफलाईन’ वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले. याच कालावधीत ‘बीएड’ प्रथम सत्राच्या रखडलेल्या हिवाळी 2019 च्या परीक्षांना सुरुवात झाली. मात्र 24 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर मनपाच्या निर्देशांमुळे विद्यापीठाने परीक्षा स्थगित केली. जर परीक्षा स्थगित केली नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका मनपाकडून घेण्यात आली होती.

अखेर मनपा आयुक्तांनी नवीन दिशानिर्देश जारी केले. त्यात राष्ट्रीय, राज्य शासन स्तरावरील परीक्षांसह विद्यापीठाच्या परीक्षाही कोरोना नियमांचे पालन करून घेता येतील अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार विद्यापीठाने परीक्षांबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर अर्धा तास अगोदरच पोहोचावे. रस्त्यात प्रशासनाने विचारणा केल्यास परीक्षा प्रवेशपत्र व ओळखपत्र सोबत ठेवण्यात यावे, असे आवाहन डॉ.साबळे यांनी केले आहे.