Home Education शरद पवारांना आणखी एक सन्मान, मिळणार डी. लिट सर्वोच्च मानद पदवी

शरद पवारांना आणखी एक सन्मान, मिळणार डी. लिट सर्वोच्च मानद पदवी

सोलापूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देण्यासाठीचा विषय सिनेट सभेत मंजूर करण्यात आला आहे. सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी हा विषय आज झालेल्या सिनेट सभेत मांडला. त्यानंतर या विषयाला सिनेट सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान सोहळा होणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी.लिट पदवी असणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे पहिली डि. लिट पदवी ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली आहे. तर 2014 साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. त्यानंतर आता सोलापूर विद्यापीठाची ही दुसरी डि. लिट पदवी ज्येष्ठ नेते आणि पद्मविभूषण शरद पवार यांना देण्यासाठीची प्राथमिक मंजुरी सिनेट सभेत देण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार यांना डी.लिट पदवी देण्यासाठीच्या विषयाला सिनेटमध्ये मंजुरी मिळाली असली तरी पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव अकॅडमी कौंन्सिलला पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडे जाणार आहे. तसंच तेथे मंजुरी मिळाल्यानंतर तो राजभवनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राजभवनाकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा पदवीप्रदान समारंभ पार पडणार असल्याची माहिती सोलापूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. विकास घुटे यांनी दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डि. लिट पदवी देण्यासाठी प्रयास संघटनेच्यावतीने विद्यापीठाला निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी केला. आज 15 मार्च रोजी विद्यापीठाची 23 वी सिनेट सभा झाली. यावेळी सूचक म्हणून सचिन गायकवाड यांनी या विषय मंजुरीसाठी मांडला होता तर सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here