- साडेसहा हजार नागरिकांचे लसीकरण
- जिल्ह्यात 68 केंद्रांवर ज्येष्ठांना लसीकरण
- प्रत्येक केंद्रावर 250 नागरिकांना लसीकरण
- अडीच लाख पात्र लाभार्थ्यांना लसीकरण
- लोकप्रतिनिधींच्या सहयोगातून लसीकरणाला वेग
नागपूर ब्युरो : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच जनतेमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच 60 वर्षावरील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अडीच लाख पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी 68 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे साडेसहा हजारापेक्षा जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, नागपूर जिल्हा परिषद व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने 60 वर्षावरील व 45 पेक्षा जास्त वयोगटातील विविध आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आजपासून लसीकरणाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय नियोजन केले असून नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख नागरिकांना येत्या दोन महिन्यात लस देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज गुमथळा व भूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच 60 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, कर्मचारी व शिक्षक घरोघरी जावून लसीकरणाबाबत माहिती देण्यासोबतच पात्र व्यक्तींची माहिती संकलित करीत आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्यातील सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घेवून गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करत आहेत. यासाठी प्रत्येक गावात दवंडीद्वारे माहिती पोहचविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 49 प्राथमिक आरोग्य केंद्र, 13 ग्रामीण रुग्णालय तसेच 6 उपरुग्णालय अशा 68 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक गावानिहाय लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शिक्षक व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने गावातील पात्र नागरिकांचे नोंदणी करुन त्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रांवर दररोज 250 नागरिकांची सुविधा करण्यात आली आहे.
त्यानुसार लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुमथळा या केंद्रावर दुपारपर्यंत 160 पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले होते. जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय लसीकरणाला सुरुवात झाली असून तहसीलदार तसेच खंडविकास अधिकारी या मोहिमेचे नियोजन करत असून प्रत्येक केंद्रांवर जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लस देण्यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करुन केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था करत आहे.
लसीकरणासाठी ग्रामस्थांमध्ये उत्साह असून महिला मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी लस आवश्यक आहे. लस घेतली तर आपण कोरोनापासून दूर राहू हा संदेश घरोघरी पोहचत आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी नागरिक पुढे येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी लसीकरणासाठी नोंदणी, लसीकरण व त्यानंतर घ्यावयाची खबरदारी याबद्दल नागरिकांना माहिती देत आहेत. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सकाळी 8 वाजता सर्व केंद्रांवर झाला आहे. आशांमार्फत गावाचे सर्वेक्षण करुन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. कामठी पंचायत समितीअंतर्गत 47 ग्रामपंचायती असून यामध्ये 19 हजार पात्र लाभार्थी आहे. येत्या दोन महिन्यात सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती खंडविकास अधिकारी अंशुजा घराटे यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कामठी तालुक्यातील विशेष लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला तसेच लसीकरण केंद्रांवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून लसीकरण करण्याविषयी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी कामठीचे सभापती उमेश रडके, सदस्या श्रीमती पुनम मालोदे, सरपंच शेषराव बोरकर, उपसरपंच वर्षा आगलावे, श्रीमती सरिता डाफ, कोमल कठाणे, यशोदरा खेडकर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने, डॉ. तिवारी, डॉ. गणवीर, विस्तार अधिकारी मनीष दिगाडे, पंकज वांढरे, राजू फरताडे आदी उपस्थित होते.