Home Nagpur नागपुरमध्ये 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुलांची श्रृंखला: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपुरमध्ये 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुलांची श्रृंखला: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

59
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर ब्युरो: अनेक महामार्ग व उड्डाणपुलांचे उद्घाटने मी केली. या ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे लोकार्पण करतांना मनात एक पोकळी व अनेक आठवणींची सोबत असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपले भावनिक बंध आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. राजकारणातील आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहावे अशा निवडक व्यक्तीमत्वांपैकी डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव आर्वजून घ्यावे लागेल. त्यांच्या कृतज्ञतेपोटी या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याच्या कल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार देत विद्यापीठाकडे जाणारा हा पूल आता खऱ्या अर्थाने ज्ञानयोगी मार्ग झाल्याचे ते म्हणाले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर पासून विद्यापीठाचे अंतर या उड्डाणपुलामुळे आता कमी झाले आहे. या महानगरातील सर्व सेवासुविधांचा विचार करतांना येथील सांस्कृतिक, कला, क्रीडा, लहान मोठे व्यवसाय याला जपणारे महानगर म्हणून ओळख निर्माण व्हावी यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर महानगरात येत्या काळात 300 ठिकाणी खेळांची मैदाने साकारले जातील. यातून सूमारे एक लाख मुले दररोज मैदानावर खेळतील. त्यांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी विविध क्रीडा महोत्सव, स्पर्धा, कला महोत्सव यातून संधी देऊन राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू यातून घडतील असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपुरमधील लहान मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाच्या उत्तम अशा वातानुकूलित सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 9 ठिकाणी भव्य मार्केट संकुल आपण साकारणार आहोत. मेडिकल चौक येथे एक भव्य उड्डाणपूल साकारुन दिल्लीच्या पालिका बाजारच्या धर्तीवर मोठे मार्केट त्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. या महानगरात दळणवळणाच्या, सार्वजनिक वाहतुकीच्या सेवासुविधा अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी मेट्रो, ईलेक्ट्रीक बस सुविधांसमवेत 135 आसनक्षमता असलेले वातानुकूलित फ्लॉशबस लवकरच नागपुरातून धावेल असे त्यांनी सांगितले. ऑरेंज सिटी, झिरो माईल सिटी व इतर वैभवांसमवेत हे महानगर स्पोर्टसिटी म्हणून नावारुपास आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपुरातील लहान वस्त्यांमधील सुविधांच्या कामांना पूर्ण करु: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

रोज नवनवीन जेथे आकाराला येते ते म्हणजे नागपूर अशी नवी ओळख आपली निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयत्नातून हे महानगर या देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून लवकरच ओळखल्या जाईल,असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरातील मोठ्या प्रमाणात ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत त्याच कटिबध्दतेने येथील लहान-लहान वस्त्यांमध्ये जी महत्वाची कामे आहेत ती सर्व प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 317 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नझूल जमिनीवर ज्यांची घरे आहेत ती नियमानुसार कायदेशिर करुन एक लाखापेक्षा अधिक लोकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. झुडपी जंगल क्षेत्रात जे गोरगरिब अनेक वर्षांपासून राहत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण न्याय देत आहोत. या महानगरात भूयारी गटार योजनेचा नवा डिपीआर आपण तयार करीत आहोत. तो लवकरच मार्गी लागेल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कोराडी रोड कडून भोसला मिलट्री टीपाईंटवर उड्डाणपुलाची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली. ही मागणी त्यांनी मान्य करुन तशी घोषणा केली.

स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना जिचकार या प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्यासपीठावर येऊ शकल्या नाहीत. त्या व्यासपीठासमोर व्हीलचेअरवर बसल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मान्यवरांनी स्टेजवरुन खाली उतरत त्यांचा जागेवर सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली.