Home Nagpur Nagpur | ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे ‘अभ्युदय सेवा प्रदर्शन’चे दुसऱ्या वर्षी आयोजन

Nagpur | ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे ‘अभ्युदय सेवा प्रदर्शन’चे दुसऱ्या वर्षी आयोजन

95

नागपूर ब्यूरो : ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे ‘अभ्युदय सेवा प्रदर्शन’ यंदा दुसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. फ्रेंड्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सहकार्याने हे प्रदर्शन 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान तात्या टोपे हॉल, नागपूर येथे सकाळी 12 ते रात्री 9 या वेळेत भरवले जाणार आहे.

या वर्षीच्या प्रदर्शनात 56 संस्था सहभागी होत असून जागा पूर्ण भरल्याने अनेक संस्थांना यावेळी संधी देणे शक्य झालेले नाही. नागपूरसह ठाणे, बदलापूर, पुणे, अहिल्यानगर, नंदुरबार, अमरावती, धारणी, मेळघाट, तिवसा, जळका, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, वर्धा आणि राजस्थानमधील संस्था यात सहभागी होत आहेत. हेल्थकेअर, शिक्षण, ट्रान्सजेंडर, दिव्यांग, महिला सबलीकरण, पर्यावरण संरक्षण, बालकल्याण, मानवी हक्क, ग्रामीण विकास, गोरक्षण, सार्वजनिक आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील संस्था प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

पितृपक्षाच्या काळात हे आयोजन होत असल्याने समाजातील दातृत्वाचा ओघ सेवाभावी संस्थांकडे वळावा हा हेतू आहे. मागील वर्षी 41 संस्थांनी सहभाग घेतला होता. यंदा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले असून एमएसडब्ल्यू विद्यार्थी व संस्थांमध्ये संवाद, जॉब फेअरची संधी, रील स्पर्धा आणि लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

13 सप्टेंबर रोजी उद्योग क्षेत्रातील प्रमुख, सीएसआर व एचआर प्रमुख प्रदर्शनास भेट देणार असून 14 सप्टेंबरला व्यापारी वर्गासाठी विशेष निमंत्रण आहे. तिन्ही दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. तसेच व्यवस्थापन, डॉक्युमेंटेशन, अकाउंटिंग, तंत्रज्ञान, शेती आदी विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतील.

शासकीय योजनांची माहिती, एनजीओंसाठी उपयुक्त कार्यशाळा आणि तज्ज्ञ दालन हेही आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष अनिल सांबरे, उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत रागीट, सचिव संजय सराफ, प्रकल्प समन्वयक मंजुषा रागीट उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये राजेंद्र काळे, प्रशांत बुजोणे, मिलिंद गिरिपुंजे, रमेश लालवानी, अनुराधा सांबरे, सुरेखा सराफ, राजेश सोनटक्के, प्रणव सातोकर आणि विजय खटी यांची उपस्थिती होती. ग्रामायण प्रतिष्ठानने आतापर्यंत सात यशस्वी प्रदर्शनांचे आयोजन केले असून सेवा संस्थांच्या कार्याला बळकटी देणे हा मुख्य उद्देश आहे.