Home Maharashtra महावितरण ही जनतेची कंपनी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी थकबाकी भरा : उर्जामंत्री नितीन...

महावितरण ही जनतेची कंपनी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी थकबाकी भरा : उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई ब्युरो : महावितरण ही जनतेची कंपनी असून ती वाचविणे व सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं सांगत महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असून त्यासाठी वीजबिलांची थकबाकी असलेल्या सर्वांनी थकबाकी भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं. थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचे निवेदन नितीन राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात केले.

विधानसभेत 2 मार्चला झालेल्या चर्चेत महावितरणद्वारे वीज जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चेच्या अधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री राऊत यांनी सभागृहात निवेदन करत वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचे निवेदन केलं.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट, वीज बिलं भरा

कोव्हिड-19 महामारीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असून ती सक्षम करणे ग्राहक राजा व आपल्या सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या कार्य क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करुन महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरुन महावितरण ही ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल, असे आवाहन राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना केले.

वीजबीले 3 महिन्याच्या सरासरीवर आधारीत

कोव्हिड महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 मार्च, 2020 पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत कोविडचे निर्बंध अत्यंत कडकपणे राबविण्यात आल्याने या कालावधीतील वीज देयके महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार मागील 3 महिन्याच्या सरासरीवर आधारीत देण्यात आली. राज्यातील सुमारे 2.50 कोटी घरगुती ग्राहकांपैकी 6 लाख 94 हजार इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 99 टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आले.

काय काय सवलती?

लॉकडाऊन कालावधीतील वीजबीलांच्या अनुषंगाने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हे वीजदेयक एकरकमी भरणाऱ्यांना 2 टक्के सवलत तर जे एकरकमी भरु शकणार नाहीत त्यांना वीजबिलात दंडनीय व्याज आणि विलंब आकार न आकारता तीन मासिक हफ्त्यात भरण्याची सुविधा अशा सवलती देण्यात आल्या. या व्यतिरिक्त ज्यांना वीज बिलासंदर्भात शंका असेल त्यांना वीज बील तपासणीची सोय करुन देण्यात आली.

कोरोनाच्या काळात वीज पुरवठा सुरळित

संपूर्ण कोरोना महामारीच्या कालावधीत महानिर्मिती, महापारेषण, महावितरणने अनेक नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करुन वीज ग्राहकांचा पुरवठा सुरळीत ठेवला आहे. या कालावधीत ग्राहकांच्या थकबाकीमुळे जानेवारी, 2021 पर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात आलेला नाही.

सद्य:स्थितीत केंद्र शासनाकडून शासकीय वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण व परवानामुक्त करण्याचे धोरण असल्याचे दिसून येत आहे. महवितरणची थकबाकी जर अशीच वाढत राहिली तर ते महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. महावितरण ही जनतेची कंपनी असून ती वाचविणे व सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

Previous articleMahashivratri । 235 वर्षात पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद
Next articleRahul Gandhi | शब्द पाळला, तामिळनाडूतील 12 वर्षाच्या मुलाला शूज पाठवले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).