पुणे ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्रात दररोज 8 हजारून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग मंदावला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने आपली मान वर काढली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.
राज्याने अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचं लक्षात घेवून राज्यसरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 2 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
2 मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यामुळे पुण्यातील असंख्य भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. परिणामी मोठ्या संख्येने भाविक एकत्र जमल्यास कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा वाढता धोका लक्षात घेवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 2 मार्च रोजी अंगारकी चतुर्थीच्या मुहर्तावर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घ्यावं, असे आवाहन केलं जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी www.dagdushethganpati.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.