Home मराठी Maharashtra । राष्ट्रवादीची महिला ब्रिगेड पीएम मोदींविरोधात आक्रमक

Maharashtra । राष्ट्रवादीची महिला ब्रिगेड पीएम मोदींविरोधात आक्रमक

593

पेट्रोल पंपावर करणार अनोखं आंदोलन

मुंबई ब्युरो : देशभरात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर रविवारी (28 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे.

‘दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे भाव गगनाला भिडत असतानाच नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत आहे,’ अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

‘ज्या पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात झळकत आहे, त्या बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ स्वयंपाकासाठी आता ही दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नाही याचा प्रतिकात्मक निषेध यातून करण्यात येईल,’ असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

या आंदोलनात रुपाली चाकणकर या पुण्यातून सहभागी होणार आहेत. तसंच या आंदोलनात अनेक महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून सहभागी होणार आहेत, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.