वर्धा ब्युरो : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट पुन्हा एका उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. यवतमाळ, अकोला पाठोपाठ वर्ध्यामध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
वर्ध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. मागील आठ दिवसांत 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 36 तासांच्या संचारबंदीला रात्रीपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाउन सोबतच जिल्हाबंदी करण्यात येण्याची शक्यता आहे.
शहरातील गिताईनगर, स्नेहल नगर, सिंदी(मेघे), लक्ष्मीनगर, मसाळा, रामनगर, सावंगी (मेघे) तसंच हिंगणघाटमध्ये गांधी वॉर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, ज्ञानदा स्कूल, देवळीमध्ये रामनगर, पुलगाव, गांधी चौक पूलगाव, नाचणगाव या ठिकाणी हॉटस्पॉट असून सदर ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.