Home Health कडकडीत बंदसाठी पालकमंत्र्यांनी मानले नागपूरकरांचे आभार

कडकडीत बंदसाठी पालकमंत्र्यांनी मानले नागपूरकरांचे आभार

600

आज देखील घराबाहेर न पडण्याचे केले आवाहन

शहरातील प्रमुख भागाचा डॉ. राऊत यांचा दौरा

नागपूर ब्यूरो : कोरोना संसर्ग नागपूर मध्ये वाढत असताना शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवार व रविवार घरीच राहण्याच्या आपला दृढसंकल्प पहिल्या दिवशी शंभर टक्के पाळल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. रविवारी देखील गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागरिकांनी शनिवार व रविवार घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. तसेच शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक कार्यक्रमांना टाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

शनिवरी व्हेरायटी चौक, बर्डी, सेंट्रल एवेन्यू रोड, अग्रसेन चौक, रेल्वे स्थानक, लकडगंज, इतवारी, शहीद चौक, बडकस चौक, महाल केळी बाग रोड, गांधीगेट चौक, गांधी सागर तलाव, नेताजी मार्केट, सीताबर्डी परिसर, शंकरनगर चौक, धरमपेठ, गोकुळ पेठ आदी परिसराचा त्यांनी फेरफटका मारला. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. त्यांच्यासोबत होते. त्यानंतर व्हेरायटी चौकामध्ये पत्रकारांशी बोलताना, त्यांनी बंद बद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच विविध व्यापारी संघटनांनी या काळात आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आरोग्यापेक्षा मोठा कोणताही प्रश्न नाही. सामान्य नागरिकांच्या हितासाठीच हा निर्णय आपण घेतला होता. नागरिकांनी पुढील काळामध्ये देखील आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. 7 मार्च पर्यंत शाळा कॉलेजेस बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तथापि, या काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असल्यामुळे वाचनालय खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रस्त्यावरची गर्दी कमी करणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ‘मी जबाबदार ‘, या मोहिमेतून प्रशासनाला मदत करावी.

नागपुरातील वाढती संख्या लक्षात घेता मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनीटायझरचा वापर करणे, अतिशय आवश्यक असून चाचणी संख्या वाढविण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा. कोणत्याच परिस्थितीत आजार अंगावर काढू नये. थोडी जरी लक्षणे आली तर लगेच स्वतःची व कुटुंबाची तपासणी करावी. तसेच सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये स्वतः अन्य नागरिकही सहभागी होतील यासाठी प्रशासनातर्फे येणारे वेळापत्रक पाळावे. शासनामार्फत वेगवेगळ्या माध्यमातून येत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना पासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गरज नसेल तर घराबाहेर न पडणे होय. रस्त्यावरची गर्दी कमी झाल्याशिवाय परस्परांच्या संपर्कातून वाढणाऱ्या कोरोना आजारावर नियंत्रण कठीण आहे. नागपूर शहर हॉट स्पॉट होता कामा नये. यासाठी सर्व नागपूरकरांनी प्रशासनाला मदत करावी. प्रशासनाचे कान आणि डोळे व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सामूहिक इच्छा शक्तीचे दर्शन : जिल्हाधिकारी

नागपूर महानगरासोबतच नागपूर परिसर व ग्रामीण भागात देखील शनिवार व रविवार नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी नागरिकांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरीच राहत या आवाहनाला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद म्हणजे सामूहिक इच्छाशक्तीचे दर्शन असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात छोट्या व्यवसायिकांनी यामध्ये घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. विविध व्यापारी संघटनांनी या काळात प्रशासनाला दिली साथ मोलाची असून सामान्य नागरिकाला आपल्या आरोग्याची किंमत कळायला लागली असून या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व जण मिळून लढणे गरजेचे असल्याचे सामान्य नागरिकांच्या लक्षात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी उद्या देखील घराबाहेर पडू नये व येणाऱ्या काळामध्ये ज्या नागरिकांची घराबाहेर पडणे आवश्यक नसेल त्यांनी शक्यतो बाहेर पडूच नये, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी घेतली केले आहे.

Previous article18 घंटे में पूरा किया 25.54 किलोमीटर के सिंगल लेन डांबरीकरण का कार्य
Next articleMaharashtra | मराठा आरक्षणासाठी रविवारी बैठक, मुख्यमंत्र्यांसह हे दिग्गज राहणार उपस्थित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).