Home मराठी Nagpur । महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली

Nagpur । महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली

983

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले बूथ कमिटी बनवण्याचे निर्देश

नागपूर ब्युरो : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. “लोकांशी संबंधित प्रश्नावर संघर्षाची भूमिका घ्या. आपण ताकदीने काम केलं तर या शहरात राष्ट्रवादी पक्ष पहिला चॉईस होईल यासाठी प्रयत्न करुया,” असं वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केलं. तर राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा नागपूर जिल्ह्यात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवस या जिल्ह्याला दिले. नागपूर शहरातील तीन मतदारसंघाचा आज आढावा घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामधील काटोल आणि हिंगणा या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर 10 जागा काँग्रेस लढवते. सध्या नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे.

जयंत पाटील यांनी नागपूरच्या बाराही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. इतकंच नाही तर काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात भेट दिली. तिथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला.

एकूणच विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना नेहमी राहिला आहे. पण विदर्भात यात्रेला सुरुवात करून राष्ट्रवादी काँग्रेस तिथे पक्षवाढीचा प्रयत्न करताना दिसत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरु केल्याचे चित्र आहे. आज जयंत पाटील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा आढावा घेतला.

ताकदीने काम केलं तर राष्ट्रवादी पहिला चॉईस होईल : जयंत पाटील

कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यातील 50 टक्के लोक तरी आपल्यासाठी आले पाहिजे. महापालिका निवडणूक लवकर आहे. ही यात्रा निवडणुकीसाठी यात्रा नाही. आमचं एक शल्य आहे, विधानसभेला चर्चा करुन आम्हाला या शहरात एकही विधानसभा लढवण्याची संधी मिळाली नाही. दक्षिण-पश्चिम मतदारसंघ (फडणवीस यांचा मतदारसंघ) आम्ही लढवू ही भूमिका घेतली होती. नागपूर पूर्वसाठी तयार होतो पण झालं नाही. आपलं अस्तित्व मान्य करण्याइतकी प्रभाव असला पाहिजे. नागपूर शहरातील सर्व मतदारसंघात काम केलं पाहिजे. संघटित राहिलं पाहिजे, ताकद उभी राहिले पाहिजे. या शहरात कार्यकर्त्यांचे जाळ वाढवावे. पुणे शहरात बूथ कमिटी तयार केली तशी बूथ कमिटी नागपुरात झाली पाहिजे. आज 2 फेब्रुवारी आहे, दोन महिन्यात बूथ कमिटी बनवा. प्रत्येक बूथवर दहा ते पंधरा जण राहिले तर मतदारांवर परिणाम होतो.”

“या शहरात आपण सत्तेत नाही. त्यामुळे या शहरात भाजप किंवा जे विरोधी पक्ष असतील त्यांच्या अवगुणावर बोट ठेवले तर वेळ येईल. हे शहर एकेकाळी काँग्रेसला मतदान द्यायचे त्यानंतर भाजपला मतदान केलं. याचा अर्थ या शहरातील लोक विचारपूर्वक मतदान करतात ते आपल्यालाही मतदान करु शकतात, निराश नका होऊ. आपण ताकदीने काम केलं तर या शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला चॉईस होईल एवढा प्रयत्न करुया,” असं पाटील यांनी नमूद केलं.

राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक आले पाहिजे : अनिल देशमुख

यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, “कार्यकारिणी फक्त कागदावर नसावी. ती शहरात काम करत राहिली पाहिजे. जेव्हा बैठक होईल ती नावापुरती नको. काम करणारे लोक घ्या. महापालिका निवडणूक आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक आले पाहिजे. मजबूत लोक आपल्या पक्षात येतील केव्हा ताकद वाढेल. ज्यांना नगरसेवक निवडणूक लढवायची आहे त्यांनी शासकीय योजना समजून घ्या, माहिती घ्या आणि ती लोकांपर्यंत पोहोचवा.”

Previous articleNagpur । मनपाचे अधिकारी, कर्मचारी 4 ला सायकल रॅली काढून करणार कर्करोग जनजागृती
Next articleBudget 2021 | रामटेक तीर्थक्षेत्र विकास के लिए 7 करोड़ मंजूर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).