भंडारा ब्यूरो : महाराष्ट्र आणि साऱ्या देशाच्याच काळजाला दुःख देणारी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळं गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
दरम्यान, रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. अवघ्या काही महिन्यांच्या आणि एक वर्ष होण्यासाठी काही दिवस शिल्लक असणाऱ्या बालकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं कळत आहे. आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं.
रुग्णालयाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती देण्यात येत नव्हती, अद्यापही पूर्ण माहिती दिली जात नाहीयं, बालकांना भेटूही दिलं जात नाहीयं त्यामुळं पालकांमध्ये आणि मृत बालकांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. काही पालकांना त्यांचं बाळ हयात आहे, की नाही याबाबतही स्पष्टोक्ती नाही. त्यामुळं त्यांच्या मनात वेगळाच काहूरही माजला आहे. सदर घटना ही रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच घडल्याचं म्हणत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.