Home मराठी Bhandara Hospital Fire | सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचं ऑडिट करा :...

Bhandara Hospital Fire | सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचं ऑडिट करा : उपमुख्यमंत्री

मुंबई / नागपूर टीम : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यमंत्री बच्चू कडू : भंडारा येथे अतिशय वाईट घटना घडली. कोणाचा हलगर्जीपणा होता याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू पुढे म्हणाले की, आज मी त्याठिकाणी भेट देणार असून यापुढे अशी घटना राज्यात घडू नये याची काळजी घेतली जाईल. शब्दांनी दुःख सहन होत नाही तरी जितकं बळ राज्य सरकारकडून द्यायचं आहे ते देण्याचं प्रयत्न करु.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : आगीची घटना घडली त्या शिशु केअर युनिटमच्या वीज प्रवाहात गेल्या सात दिवसांपासून समस्या होती. वीजपुरवठा कमी जास्त होत होता. त्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही. मे 2020 पासून तर तीन वेळा रुग्णालयाने इलेक्ट्रिक ऑडिट करा असे पत्र दिले होते, मात्र, तरीही ऑडिट केलं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राम कदम : भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल राज्यपालांकडून दु:ख व्यक्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देणार

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी भेट देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here