Home मराठी Bhandara Hospital Fire | नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा दुर्दैवी...

Bhandara Hospital Fire | नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू

418
0

भंडारा ब्यूरो : महाराष्ट्राच्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.

या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.

दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.

आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत

राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त

गृहमंत्री अनिल देशमुख : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज मी स्वतः घटनास्थळी भेट देणार आहे.

खासदार राहुल गांधी : भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शाह : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही. मी मृत बालकांच्या कुटुबीयांचं सांत्वन करतो. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ देवो,” असं अमित शाह यांनी ट्वीट केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

नियोजीत सत्याग्रह कार्यक्रम रद्द

भंडारा येथे झालेल्या मन व्यथीत करणा-या घटनेमुळे शनिवार दि.9 जानेवारी रोजी होणारा जय जवान -जय किसान संघटना
नागपुर यांचा सत्याग्रह कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती प्रशांत पवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here