Home हिंदी Nitin Ronghe । आम्ही पदवीधराच्या बौद्धिक आणि हृदयाला साद घातली

Nitin Ronghe । आम्ही पदवीधराच्या बौद्धिक आणि हृदयाला साद घातली

698

नागपूर ब्यूरो : नितिन रोंघे म्हणतात, दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी मी आपली उमेदवारी जाहीर करण्यासाठी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर 12 तारखेला फॉर्म भरून आम्ही प्रचाराचा श्री गणेशा केला. या काळात आजपर्यंत आम्ही विदर्भातील सहाही जिल्हे व 64 पैकी 43 तालुक्यामध्ये जाऊन ही निवडणूक का लढत आहे, याबाबत लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडली. ते इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकांचा मिळणारा प्रतिसाद इतका उत्साहवर्धक आहे कि संसाधने व पैसे कमी असतानासुद्धा या क्षणी सुद्धा आमचा प्रचार नागपूर विभागाच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे. ही पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही पदवीधराच्या बौद्धिक आणि हृदयाला साद घातली आणि केवळ विदर्भाचा विकास आणि स्वतंत्र विदर्भ राज्य ह्या विषयावरच आपला प्रचार केंद्रित केला. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु मला सांगताना आनंद होत आहे कि, माझ्या या निवडणुकीत एकही कार्यकर्ता नसून माझ्या प्रचारासाठी अहोरात्र राबणारे हे सर्व माझे सहकारी आहेत. यासोबतच आमचे सर्व सहकारी पक्ष – विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा पार्टी, बळीराजा पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, केंद्रीय जनविकास पार्टी. या सर्व पक्षातील सहकार्यांनी खूप मेहनत घेतली व आजही मेहनत घेत आहेत. आम्हाला आनंद आहे कि, विदर्भाच्या मुद्द्यावर हि निवडणूक होत असल्यामुळे जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ फार्मसी असोसिएशन आणि इतर अनेक संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आम्हाला समर्थन दिले व आमचा उत्साह वाढविला आहे.
आजच्या ह्या पत्रकार परिषदेद्वारे आमच्या दोन्ही प्रस्थापित पक्षाच्या विरोधी उमेदवारांना आम्ही काही प्रश्न विचारात आहोत. ही निवडणूक विचारांवर व्हावी असा आमचा मानस आहे म्हणून हे प्रश्न !

1) गेली 50 वर्षांच्या वर भारतीय जनता पक्षाचे आमदार नागपूर पदवीधर मतदार संघातून राहिले आहेत. तेव्हा त्यांनी पदवीधरांसाठी केलेल्या 5 गोष्टी दाखवाव्यात.
2) कोरोनाच्या महामारीत नागपूर शहरात जेव्हा एप्रिल मे महिन्यात नागपूर शहरातील समस्त जनता, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगर पालिकेचे कर्मचारी, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे हे सर्व कोविड योद्धा ज्यावेळी कोरोना विरुद्ध लढत होते. त्यावेळी नागपूर शहराचे महापौर हे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लढत होते आणि शेवटी त्यांनी मुंडे यांची नागपुरातून बदली केली. कोविड काळात जो माणूस या शहरातील नागरिकांसाठी आपल्या जीवाचं रान करत होता त्या काळात त्यांची ही कृती योग्य होती का? आजही कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महापौर हे प्रचारात फिरत आहेत तर महानगरपालिकेच्या कारभार कोण बघत आहे? भारतीय जनता पक्ष व महापौर कृपया या गोष्टींचा खुलासा करतील काय?
3) भाजपाचे उमेदवार आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये विदर्भातील अनुशेषाचा प्रश्न उचलीत आहे. माझा त्यांना एकच प्रश्न आहे कि ते अजून ही स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार करतात का, कि निवडणूक आली आहे म्हणून त्यांना फक्त विदर्भ आठवला आहे. कारण नागपूर सोबतच औरंगाबाद आणि पुणे विभाग पदवीधर मतदार संघात सुद्धा निवडणूक असून भारतीय जनता पक्षाची स्वतंत्र विदर्भ राज्याबद्दल नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करणे गरजेचे आहे?
4) महाराष्ट्र शासन गृह विभागातर्फे जवळपास 12500 पोलीस कॉन्स्टेबल आणि एमएसइबी मार्फत जवळपास 3500 जागा भरणार आहेत. सरकारी नोकर्यांमध्ये विदर्भाचा बॅकलॉग प्रचंड आहे. ह्या जागा भरत असताना नागपूर करार कलाम 8 व घटनेतील कलम 371(2) नुसार आधी विदर्भातील युवकांना रोजगार देऊन नंतर महाराष्ट्रातील इतर भागातील युवकांना नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे. याबाबत भाजपा आणि काँग्रेस चे काय मत आहे. हे दोन्ही पक्ष या बाबीचे समर्थन करतात कि नाही हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
5) काँग्रेसच्या उमेदवारांनी संवाद पत्रिकेद्वारे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत लिहिले आहे कि सलग 15 वर्षे ते रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. त्यांना प्रश्न आहे की आपण इतकी वर्षे नागपूर विद्यापीठाची सेवा करत असताना सुद्धा नागपूर विद्यापीठाचं मानांकन इतकं खाली का गेलं? नागपूर विद्यापीठ हे पहिल्या 150 मानांकनात सुद्धा नाही.
6) काँग्रेसच्या उमेदवारांनी आपल्या वरील पत्रात लिहिले आहे कि, ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आहेत. परंतु 2005 साली त्यांनी दक्षिण नागपुरातून विधान सभेची निवडणूक अपक्ष म्हणून काँग्रेसच्या विरोधात का बरं लढवली होती. याचा खुलासा होणे गरजेचे आहे?
7) काँग्रेसच्या उमेदवारांनी लिहिलेले आहे कि, ते त्यांच्या शिक्षण संस्थेचा संपूर्ण कारभार एकहाती सांभाळतात. याने आमच्या मनात एक प्रश्न उठतो कि स्वतःच्या संस्थेत ते लोकशाही पाळत नाहीत का? उद्या एखादे लोक प्रतिनिधी झाल्यावर ते आपल्या मतदारांचे किंवा सहकाऱ्यांचे मत विचारात न घेता स्वतःच्या मनमर्जीने एकहाती कारभार चालवणार आहेत का?
आमचा प्रचार हा अत्यंत नियोजन पद्धतीने राबविला गेला असून आम्ही आमच्या प्रत्येक मतदारानुसार आपला जाहीरनामा प्रस्तुत केला आहे. पदवीधर, बेरोजगार, डॉक्टर, शिक्षक महिला, व इतर अनेक त्या सोबतच आमचे विदर्भ विकासासाठी विविध जिल्ह्यासाठी असलेले ब्लू प्रिंट आम्ही लोकांसमोर मांडलेले आहे.
काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
अ ) रु. 25000 महिना देणाऱ्या एक लाख नोकऱ्यांचे निर्माण.
ब) शिक्षित युवकांचे पलायन (Non Voluntary)
क) माजी मालगुजारी तलाव 1,16,000 हेक्टर सिंचन.
क) प्रदूषण
ड) महिला आरोग्य व इतर
याबाबत सविस्तर माहिती आमची website NitinRonghe.com वर उपलब्ध आहे.
या पत्रपरिषदे द्वारे नागपूर विभागातील सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती आहे कि मतपत्रिकेवरील अ.क्र. 9 समोरील माझ्या नावासमोर आपले पसंती क्र.1 चे मतदान करावे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).