Home हिंदी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ : ॲड. मिरा खड्क्कार यांचा केला महापौरांनी सत्कार

‘सन्मान स्त्री शक्तीचा’ : ॲड. मिरा खड्क्कार यांचा केला महापौरांनी सत्कार

699

नागपूर ब्यूरो : नवरात्रीचे औचित्य साधून महापौर संदीप जोशी यांनी नऊ दिवस विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने इतरांसाठी प्रेरणा ठरणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचा संकल्प केला. याअंतर्गत सोमवारी (ता. 19) तिसऱ्या दिवशी ॲड. मिरा खड्क्कार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौर संदीप जोशी यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी उपमहापौर मनीषा कोठे यांची उपस्थिती होती. साडी-चोळी, मनपाचा दुपट्टा, तुळशीचे रोपटे आणि मानपत्र देऊन हा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या ॲड. मिराताई खड्डकार राष्ट्रीय महिला आयोगाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. मिराताई भारतीय स्त्री शक्तीच्या कायदा विषयक शाखेत राष्ट्रीय अध्यक्षाही होत्या. त्या जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या नागपूर युनीटच्या अध्यक्षादेखिल आहेत.

मिराताईंकडे राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिलांशी संबंधित नियम व कायद्याच्या योग्य अंमलबजावणीवर देखरेखीचे काम सोपविण्यात आले आहे. महिलांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षा, मालमत्ता हक्क आणि विकासासाठी त्यांना कायदेशीर सहाय्य देण्यात मिराताईंचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना आम्हाला आनंद होत असल्याचे गौरवोद्‌गार महापौर संदीप जोशी यांनी काढले.

ॲड. मिरा खड्क्कार यांनी या सत्काराबद्दल महापौर संदीप जोशी यांचे आभार मानले. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीची आराधना. या काळात महापौरांनी नागपूर शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा केलेला संकल्प हा प्रत्येक महिलेच्या कार्याला प्रोत्साहन देणारा असल्याचे मत त्यांनी मांडले. या सत्कारबद्दल आपण ऋणी असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).