कॉम्हाड-सीएचपीए आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने केला गौरव
नागपूर ब्यूरो : कोव्हिड वैश्विक महामारीच्या काळात ‘फ्रंट लाईन वॉरियर’ म्हणून आव्हानात्मक कालावधीत कोव्हिड-19 चे संक्रमण थांबविण्यासाठी लढणाऱ्या महापौर संदीप जोशी यांचा यूके येथील कॉम्हाड आणि सीएचपीए या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. कॉम्हाडचे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. गिरीश चरडे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. उदय बोधनकर म्हणाले, कॉम्हाड, सीएचपीए ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संस्था आहे. 54 देशांमध्ये या संस्थेचे कार्य आहे. कोव्हिड काळात या संस्थेने कोरोना योद्धांना सतत प्रोत्साहन दिले. नागपुरात महापौर संदीप जोशी यांनी या शहराचे प्रथम नागरिक म्हणून स्वत: रस्त्यावर उतरले. लढण्यासाठी त्याग आणि समर्पण हे गुण लागतात. महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड काळात या गुणांचा परिचय देत नागरिकांना नेहमीच सतर्क केले.
कोव्हिडकाळात संपूर्ण नागपुर शहर, वॉर्ड व वस्त्या, झुग्गी झोपडी ग्रामीण नागपूर जिथे सुविधांचा अभाव आहे अशा भागात स्वत: पुढे येत त्यांनी कार्य केले. लोकांसाठी रस्त्यावर उतरून एक योद्ध्याप्रमाणे ते लढले. यंत्रणेलाही कामाला लावले. त्यांची ही भूमिका या शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह होती. कोव्हिडविरुद्धच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला आणि नागपूरकरांसमोर आदर्श उभा केला. त्यांच्या या कार्याचा गौरव ‘कोरोना योद्धा’ म्हणून करताना आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे कॉम्हाडचे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांनी सांगितले.
कॉम्हाडचे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांनी स्मृतिचिन्ह, आत्मचरित्रपर पुस्तक, कॉम्हाडची डिरेक्टरी देऊन हा सन्मान केला. भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. गिरीश चरडे यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
सन्मान शहीदांना समर्पित : महापौर
महापौर संदीप जोशी यांनी या सन्मानाबद्दल कॉम्हाडचे आभार मानले. हा सन्मान आपला नसून कोव्हिड काळात फ्रंट लाईनवर लढणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांचा, परिचारिकांचा, आरोग्य कर्मचाऱ्यांचा, पोलिसांचा आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचा आहे. कोव्हिडशी लढा देताना शहीद झालेल्या योद्ध्यांना आपण हा सन्मान समर्पित करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).