– मनपातील ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’चे प्रशिक्षण पूर्ण
नागपूर ब्युरो : नागपूर शहरातील नागरिकांची विविध आजारांपासून सुरक्षा करण्याकरिता मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटची भूमिका महत्वाची आहे. विविध विषयाशी संबंधित तज्ञ आणि शहरातील इतर विभागांचे योगदान या सर्वांशी समन्वयाने शहरात आरोग्य सुरक्षेचे कार्य होणार आहे. यात नागपूर शहराच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट’ (एमएसयू) समन्वयकाची भूमिका निभावणार आहे, असा सुर एमएसयू प्रशिक्षणादरम्यान मान्यवरांनी व्यक्त केला.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुरु झालेल्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता ७, ८ व ९ जुलै २०२५ रोजी तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. बजेरिया येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी मधील सभागृहामध्ये हे प्रशिक्षण पार पडले. सोमवारी (ता.७) एनसीडीसी दिल्लीच्या सहसंचालक डॉ. शुभांगी कुलसंगे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले तर बुधवारी (ता.९) आयडीएसपीचे विभाग प्रमुख व राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) चे सहसंचालक डॉ. हिमांशु चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचा समारोप झाला. दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर होते.
प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट संदर्भातील विविध बारकावे समजावून सांगितले व त्यातील कार्याबाबत अवगत केले. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रशिक्षणादरम्यान मनपा व एमएसयू ची भूमिका स्पष्ट केली. आयडीएसपी चे विभाग प्रमुख व राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) चे सहसंचालक डॉ. हिमांशु चौहान, एनसीडीसी दिल्लीच्या सहसंचालक डॉ. शुभांगी कुलसंगे, टीएसयू-एमएसयू दिल्लीचे प्रमुख डॉ. प्रदीपकुमार आवटे, मनपा साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, टीएसयू-एमएसयू दिल्लीचे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट डॉ. सत्यम सील, टीएसयू-एमएसयू दिल्लीचे पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट डॉ. अमोल मानकर, टीएसयू-एमएसयू-एनसीडीसी दिल्लीचे कार्यक्रम व वित्त व्यवस्थापक श्री. अमित तिवारी, माहिती तंत्रज्ञान तज्ञ श्री. श्रीनु याराग्रला, विभागीय प्रशिक्षण केंद्रचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजय कारलेकर, डब्लूएचओ चे सव्ह्रेर्लन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद या सर्व मान्यवरांनी विविध विभागांचे कार्य आणि कार्यवाही बद्दल मार्गदर्शन केले.
बुधवारी (ता.९) नागपूर शहरातील आरोग्य क्षेत्रातील विविध विभागांच्या प्रतिनिधींसोबत ‘आंतरविभागीय समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा उद्देश ‘वन हेल्थ अप्रोच’ अर्थात मानव व पर्यावरणातील सर्व सजीव घटक या अंतर्गत विविध विभागांचे समन्वय साधून एकत्रित प्रयत्नांनी व्यवस्था बाळकटीकरण करणे हा आहे. या बैठकीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.पी. गहलोत यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा, महाराष्ट्र प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर या विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
एमएसयूच्या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये एमएसयूची भूमिका आणि जबाबदारी, आयडीएसपी चा आढावा, साथीच्या रोगांची माहिती-रोग प्रसाराची गती, रोगांचा प्रादुर्भाव ओळख आणि तपासणी, सार्वजनिक आरोग्य सेवेतील आपत्कालीन स्थितीचा आढावा, ‘वन हेल्थ’ संकल्पनेच्या दृष्टिकोनाचा स्वीकार व त्यासाठी इतर विभागांशी समन्वय, आयडीएसपी आणि एमएसयू प्रयोगशाळेअंतर्गत शहरातील इतर प्रयोगशाळांचे समन्वयन व बाळकटीकरण, किटकजन्य आजाराची निगरानी, आरोग्य आपत्कालीन स्थितीमध्ये निगरानीच्या दृष्टीने जनतेशी संवाद आणि समुदायाचा सहभाग, लसीकरणाद्वारे प्रतिबंधित रोगांची निगरानी व गोवर रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन या विषयातील बारकावे तज्ञांनी समजावून सांगितले. याशिवाय एमएसयू मधील कर्मचाऱ्यांना परिस्थिती निहाय विषय देऊन त्यावरील कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला. प्रशिक्षणाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे संचालन मनपा आरोग्य विभागाच्या अधिपरिचरिका दीपाली नागरे यांनी केले व आभार एमएसयूचे सीनियर पब्लिक हेल्थ सपेशालिस्ट डॉ. वीरेंद्र वानखेडे यांनी मानले.