– मनपा शाळेतील मुलांसाठी ‘संगणक लॅब बस’
नागपूर ब्युरो : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी याकरिता मनपा आता संगणकच थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला घेऊन आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ८) विंग्स फ्लाय हाय-मोबाईल संगणक शिक्षण बस लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे पार पडलेल्या छोटेखानी समारंभात विंग्स फ्लाय हाय-मोबाईल संगणक शिक्षण बस लॅबचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, एल्केम साउथ एशियाचे प्लांट प्रमुख श्री. कुमार किन्ले, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. संजय बेडेकर, सह्याद्री फाउंडेशनचे संचालक श्री. देवेंद्र क्षीरसागर, विंग्ज फ्लाय हायचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितेश नागदेवे, यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
एल्केम साउथ एशिया प्रा. लि. आणि सह्याद्री फॉउंडेशन,नागपूर यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर निधीतून ही संगणक शिक्षण बस लॅब विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘विंग्स फ्लाय हाई’ असे या प्रकल्पाचे नाव असून, या माध्यमातून मनपा शाळातील विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण प्रदान केले जाणार आहे. हे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम पाउल असून, या डिजिटल साक्षरतेची सुरुवात पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेतून करण्यात आली. विशेष म्हणजे, पुढील तीन महिने हे फिरते संगणक मनपाच्या जास्त पट संख्या असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देणार आहे.