Home मराठी महाराष्ट्रात शिंदेसेना-भाजपचे सरकार, 164 मतांनी बहुमताचा प्रस्ताव जिंकला

महाराष्ट्रात शिंदेसेना-भाजपचे सरकार, 164 मतांनी बहुमताचा प्रस्ताव जिंकला

विरोधात 99 मते; एमआयएम, समाजवादी पक्ष तटस्थ

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर आज भाजप व शिंदे गटाने बहुमत चाचणीही जिंकली. बहुमताच्या बाजूने शिंदे-भाजप सरकारने 164 मते मिळवली. तर विरोधात मविआकडून केवळ 99 जणांनी मते दिली. विधासभा अध्यक्ष निवडणुकीप्रमाणे आजही समाजवादी पक्ष व एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.

दरम्यान, बहुमताच्या चाचणीपुर्वीच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटासोबत बसमधून ते विधानभवनात दाखल झाले. संतोष बांगर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या 40वर गेली आहे. तर शिवसेनेकडे आता केवळ 15 आमदार उरले आहेत. विशेष म्हणजे संतोष बांगर यांनी कालच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपली बाजू बदलली.