Home मराठी उद्धव ठाकरेंचा आरोप । भाजपकडून शिवसेना संपवण्याचा डाव: हिंमत असेल तर मध्यावधी...

उद्धव ठाकरेंचा आरोप । भाजपकडून शिवसेना संपवण्याचा डाव: हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या

भाजपकडून शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. पण आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपला दिले. शिवसेना भवनात सोमवारी आयोजित जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान असल्याचे ठाकरे म्हणाले.

घटनातज्ज्ञांनी स्पष्ट भूमिका मांडावी : विधिमंडळात सध्या जे सुरू आहे ते घटनेला धरून सुरू आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरू आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन त्यांनी घटनातज्ज्ञांना केले. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या, असे ते म्हणाले. पुढील काळात लढायचे असेल तर सोबत राहा, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेना भवनातील बैठकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता.

सत्ता गमावल्यानंतर आणि स्वकीयांनीच दगा दिल्याने दुखावलेले शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांची एकजूट करण्यासाठी ते शिवसैनिकांच्या भेटी-गाठी घेत आहेत. शिवसैनिकांशी मोकळा संवाद आणि हितगूज ते साधत आहेत. शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठीच मातोश्रीवर आयोजित केलेली बैठक हा त्याचाच एक भाग आहे.