Home Defence नागपूरचे सुपुत्र मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख, मनोज नरवणे यांच्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला...

नागपूरचे सुपुत्र मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख, मनोज नरवणे यांच्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला सन्मान

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. ते विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे स्थान घेतील. नरवणे यांचा २८ महिन्यांचा कार्यकाळ ३० एप्रिलला पूर्ण होत आहे. केंद्र सरकारने पांडे यांच्या नियुक्तीला हिरवी झेंडी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. मूळ नागपूरचे असलेले मनोज पांडे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत. ते लष्करप्रमुख होणारे कोअर ऑफ इंजिनिअर्सचे पहिले अधिकारी असतील. आतापर्यंत इन्फंट्री, आर्मर्ड आणि आर्टिलरीच्या अधिकाऱ्यांनी हे पद भूषवले आहे.

पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. याआधी ते लष्कराच्या पूर्व कमांडचे नेतृत्व करत होते. या कमांडकडे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या निगराणीची जबाबदारी आहे. पांडे यांनी ३९ वर्षांच्या सेवेत ‘ऑपरेशन विजय’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये भाग घेतला आहे. एनडीएचे विद्यार्थी असलेले पांडे यांना डिसेंबर १९८२ मध्ये कोअर ऑफ इंजिनीअर्समध्ये कमिशन देण्यात आले. ३९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, लष्करप्रमुखांच्या प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.

कुटुंबात लष्करी परंपरा
मनोज पांडे नागपूरचे आहेत. नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख सी. जी. पांडे आणि दिवंगत प्रेमा पांडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचे धाकटे भाऊ संकेत हेही कर्नल म्हणून निवृत्त झाले आहेत. पांडे यांचा मुलगा अक्षय हवाई दलात वैमानिक आहे. पांडेंच्या पत्नी अर्चना गृहिणी आहेत.