Home Police रश्मी शुक्लांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल; आघाडी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, पुणे पोलिसांची कारवाई

रश्मी शुक्लांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल; आघाडी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, पुणे पोलिसांची कारवाई

585

राजकीय नेते, लोकप्रतिनिधींचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप महाविकास आघाडीभोवती कारवाईचे फास आवळत असताना, राज्य यंत्रणांच्या माध्यमातून भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल केलेला हा दुसरा गुन्हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जाते. यापूर्वी मुंबई पोलिसांनीही रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

शुक्ला यांनी सन २०१५ ते १९ या पाच वर्षांच्या कालावधीत फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या पडताळणीत लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंग केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांबाबत पैसे मागत असल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेच्या सुनावणीवेळी वरिष्ठ सरकारी वकील दारियस खंबाटा यांनी गोपनीय माहितीचे दोन पेनड्राइव्ह सरकारच्या ताब्यात आहे, असे सांगून तिसरा पेनड्राइव्ह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्रालयास दिला, असे सांगितले होते. हा पेनड्राइव्ह फडणवीस यांना शुक्लांनी दिल्याचा आघाडी सरकारचा आरोप आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वात शुक्ला यांनी गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे चौकशी करण्यात आली होती. त्या अहवालाचा दाखला देत २५ मार्च २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक, मंत्री जितेंद्र आव्हाड व मंत्री हसन मुश्रीफ यांनी रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत असल्याचा आरोप केला होता. दुसऱ्याच दिवशा कुंटेंच्या अहवालाच्या आधारावर २६ मार्च २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात अमली पदार्थ विक्रीची टोळी असल्याचे सांगून तत्कालीन मुख्य सचिवांकडून फोन टॅपिंगची परवानगी घेण्यात आली होती, असा आरोप आहे. फोन टॅपिंगसाठी नेते, लोकप्रतिनिधींच्या नावांना कोडवर्ड देण्यात आले.

नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. सार्वजनिक आणि अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली जाते, परंतु शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगची गरज नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांनी हे फोन कशासाठी टॅप केले हे लवकरच समोर येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

रश्मी शुक्ला १९८८ बॅचच्या अधिकारी : शुक्ला या मूळच्या मुंबई येथील रहिवासी असून सन १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. मार्च २०१६ मध्ये त्यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांची राज्य गुप्त वार्ता प्रमुख म्हणून मुंबई येथे नियुक्ती झाली होती.

Previous articleEquity Mutual Funds । सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय करावं
Next articleदेशात 24 तासात 11,499 नवीन रुग्ण, 255 मृत्यू; दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांवरील निर्बंध हटवले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).