Home मराठी ना स्वागत, ना भाषण.. फक्त शिवजागर, क्रांती चौकात 25 हजार शिवप्रेमींचा जल्लोष

ना स्वागत, ना भाषण.. फक्त शिवजागर, क्रांती चौकात 25 हजार शिवप्रेमींचा जल्लोष

478

ऐसा सोहळा पाहिला… रयत धन्य जाहली, असेच वर्णन इतिहासकार या प्रसंगाचे करतील. हा प्रसंग आहे १८ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीचा. स्थळ क्रांती चौक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५१ फूट उंच अश्वारूढ पुतळा अनावरणाचा हा सोहळा होता. त्यात ना स्वागत, ना भाषण… फक्त शिवजागर … अवघ्या जगाने पाहिला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मशाल पेटवली. त्यानंतर लाइट, कोल्ड फायर अन् फटाक्यांच्या आतषबाजीने पुतळा उजळून निघाला. सुमारे २५ हजार शिवभक्त क्रांती चौकात हजर होते, असा पोलिसांचा अंदाज आहे.

शुक्रवारी सकाळपासून शिवप्रेमींचा जल्लोष सुरू होता. रात्री नऊच्या सुमारास मनपाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झाकलेला कपडा काढला तेव्हा या जाणत्या राजाच्या दर्शनाने तमाम शिवभक्त भारावून गेले. घोषणाबाजीला आणखी उधाण आले. पूर्वनियोजनानुसार रात्री १२ वाजताच अनावरण होणार होते. मात्र, प्रचंड रेटारेटी होऊ लागल्याने तासभर आधीच अनावरण करण्यात आले. मान्यवरांची भाषणे, स्वागताला फाटा देण्यात आला, हे या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य होते.

आदित्य ठाकरे यांनी भगवा ध्वज घेऊन तो गाण्याच्या तालावर नाचवला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी या जल्लोषाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले. या वेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, सतीश चव्हाण, संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, विनोद पाटील, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांचा आयोजनात पुढाकार होता. प्रेषित रुद्रवार यांनी सूत्रसंचालन केले.

सायंकाळी सात ते पावणे आठ दरम्यान शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले. नंतर महाआरतीने शिवजयंती महोत्सवाला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. सायंकाळी पोवाडा, शिवगीतांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सात ते पावणेआठ दरम्यान चौथाऱ्याभोवती शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले. महिलांनी ताट हातात घेऊन व हजारो शिवप्रेमींनी टाळ्या वाजवून शिवरायांची महाआरती केली. ढोल-ताशांचा निनाद व महाआरतीच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

Previous articleइंदौर में एशिया का सबसे बड़ा सीएनजी प्लांट, पीएम मोदी आज करेंगे वर्चुअल लॉन्चिंग
Next articleCovid- 19 | नागपूर जिल्ह्याला कोरोना निर्बंधातून मिळणार शिथिलता
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).