Home Education राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेच्या संदर्भात महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चे अनुकरण करते...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेच्या संदर्भात महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चे अनुकरण करते : उपराष्ट्रपती

574

वर्धा ब्युरो : देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चे अनुकरण करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्‍ये शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा ठेवण्याचाही प्रस्ताव आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. महात्मा गांधींनी 1937 मध्ये वर्धा येथेच प्रस्तावित केलेल्या ‘नई तालीम’ मध्ये मोफत व अनिवार्य शिक्षणासोबतच मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनवणे आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे यांचा समावेश होता. असे प्रतिपादन उपराष्‍ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी केले.

ते मंगळवार, 4 जानेवारी 2022 ला वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला आभासी माध्‍यमातून संबोधित करत होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच अटलबिहारी वाजपेयी भवन व चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्घाटन रिमोट दाबून केले. श्री नायडू म्हणाले की, संविधान सभेने प्रदीर्घ चर्चेनंतर हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले आणि आठव्या अनुसूचीमधे इतर भारतीय भाषांनाही घटनात्मक दर्जा दिला. प्रत्येक भारतीय भाषेचा गौरवशाली इतिहास आहे, समृद्ध साहित्य आहे असे सांगून ते म्हणाले की, “आपल्या देशात भाषिक विविधता आहे हे आपले भाग्य होय. आपली भाषिक विविधता ही आपली ताकद आहे, कारण आपल्या भाषा आपली सांस्कृतिक एकता व्यक्त करतात.”

गांधीजींचे ‘नई तालीम’, त्यांच्या अनुभवांवर केलेले संशोधन आणि विद्यापीठाने केलेले राष्ट्रीय अभ्यास शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे उपराष्ट्रपती म्हणाले. या संदर्भात उपराष्ट्रपतींनी युवा विद्यार्थ्यांना संप्रदाय, जन्म, प्रदेश, लिंग, भाषा इत्यादींच्या आधारे भेदभावाची भावना सोडून देशाची एकता मजबूत करण्याचे आवाहन केले.

भाषेबाबत महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधींसाठी भाषेचा प्रश्न हा देशाच्या एकात्मतेचा प्रश्न होता. राष्ट्रभाषेशिवाय राष्ट्र मूक आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी हिंदी सोपी आणि सर्वसामान्यांना सुलभ व्हावी, जेणेकरून हिंदीचा प्रसार विपुल प्रमाणात होईल असे आवाहन केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, हिंदीचा आग्रह असतानाही महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाची मातृभाषेबद्दलची संवेदनशीलता समजून घेतली. त्यांनी मातृभाषा स्वराज्याशी जोडली. स्वराज्याचा अर्थ कोणावरही भाषा लादू नये असा महात्मा गांधींचा विश्वास होता. सर्वप्रथम मातृभाषेला महत्त्व दिले पाहिजे. खरी अभिव्यक्ती मातृभाषेतच होऊ शकते.

उपराष्ट्रपती म्हणाले की, सुसंस्कृत समाजाची भाषा सभ्य, सुसंस्कृत आणि सर्जनशील असावी. साहित्य लेखनातून सभ्य संवाद समाजात रुजवावा, वाद निर्माण करू नये, ही संस्कृती विद्यापीठांनी रुजवावी, अशी त्यांची अपेक्षा होती. “भाषेच्या मर्यादा आणि समाजाच्या शिस्तीत राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करूया.” असेही ते म्‍हणाले.

राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते म्हणाले की, “डॉ. आंबेडकर जीवनभर शिक्षण आणि समतेसाठी कटिबद्ध राहिले. त्यांच्या जीवन संघर्षात शिक्षणाने त्यांना मार्गदर्शन केले.” डॉ.आंबेडकरांचा पुतळा विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्तंभ म्हणून कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, डॉ.आंबेडकरांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी भाषा आवश्यक मानली.

उपराष्ट्रपती म्हणाले की, आपल्या भारतीय भाषांनी परदेशात पसरलेल्या भारतीय समुदायाला आणि जगातील इतर हिंदी भाषिक देशांना भारत मातृभूमीशी जोडून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संदर्भात, उपराष्ट्रपतींनी विद्यापीठांना त्यांच्या बौद्धिक प्रवचनात हिंदी भाषिक देश आणि परदेशी भारतीय समुदायातील लेखकांच्या साहित्यकृतींचा समावेश करण्याचे आवाहन केले.

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठातील अटलबिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्‍ते करण्यात आले. माजी पंतप्रधान स्‍व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हिंदी सेवेचे स्मरण करून श्री नायडू म्हणाले की, परराष्ट्र मंत्री म्हणून आदरणीय अटलजींनी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेला हिंदीत संबोधित केले. वर्षानुवर्षे ती परंपरा नियमितपणे पाळली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अमर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे लोकार्पण करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यातील तरुण क्रांतिकारकांच्या धैर्याची जाणीव देशातील तरुण पिढीला झाली पाहिजे. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी स्मृतिचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. विश्वविद्यालयाच्या कामगिरीचा उल्लेख करून श्री. नायडू म्हणाले की, विश्वविद्यालयाने हिंदी साहित्यातील अनेक प्रसिद्ध कलाकृती ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणेकरून दूरवरच्या देशात बसलेल्या हिंदीच्या वाचकांना हिंदीचे अस्सल साहित्य वाचता येईल. या संदर्भात त्यांनी हिंदीसोबतच इतर भारतीय भाषांमधील साहित्य ही ऑनलाइन उपलब्ध करून दिले पाहिजे, जेणेकरून भारतीय भाषांच्या समृद्ध साहित्याची ओळख जगाला होऊ शकेल.

आपली भाषिक विविधता हे देशाचे सामर्थ्य असल्याचे सांगून उपराष्ट्रपतींनी या विविधतेतील एकतेचा धागा अधिक दृढ करण्याचे आवाहन करून त्यासाठी भाषांमधील संवाद वाढणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कामात विद्यापीठांतील भाषा विभाग महत्त्वाची भूमिका बजावतील, असे ते म्हणाले. विद्यापीठांच्या भाषा सतत संपर्क आणि बौद्धिक संवाद व्हायला हवा. भारतीय भाषांमध्ये होणारे लेखन आणि प्रयोग यांचा विचार करून त्यांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज, जपानी या परदेशी भाषा हिंदी माध्यमात शिकविल्या जात आहेत. याबद्दल आनंद व्यक्त करून श्री नायडू यांनी या सुविधेत इतर भारतीय भाषांचा समावेश करण्याचे आवाहन केले. तुम्ही ही सुविधा इतर भारतीय भाषांसाठी देखील प्रदान केली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी इतर भारतीय भाषा शिकू शकतील.” या संदर्भात सर्व भारतीय भाषांमधील साहित्याचे अन्य भाषांतील अनुवाद वाचकांपर्यंत पोहोचवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे 1975 मध्ये नागपुरात झालेल्या जागतिक विश्‍व हिंदी संमेलनात प्रथमच आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना 1997 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाद्वारे करण्यात आली. 2022 मध्ये या विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित केला जात आहे. श्री.नायडू म्हणाले की, वर्ध्याची पवित्र भूमी महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या जीवन तत्वज्ञानाची साक्षीदार आहे. ते म्हणाले की, वर्धा हे देशाचे प्रेरणास्थान आहे. हिंदी भाषेची सहजता यावर उपराष्‍ट्रपती म्‍हणाले की कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांच्‍या सारखी सोपी व बोधप्रद भाषेची देशाला गरज आहे. विश्‍वविद्यापीठांनी अशा प्रकारच्‍या भाषेच्‍या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, विश्वविद्यालय शांतता आणि मैत्रीच्या विचारसरणीनुसार कार्यरत आहे. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याची विश्वविद्यालयात स्थापना झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले की, बाबासाहेबांनी समाजात समानता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व राष्ट्रवादाची भूमिका बजावली. संविधानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

श्री आठवले यांनी अटलजींचे स्मरण करताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी उपराष्ट्रपती श्री एम. वेंकैया नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, विद्यापीठाच्या इतिहासात 25 वे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय भाषांच्या दृष्टिकोनातूनही हा महत्त्वाचा क्षण आहे. भारतात सामाजिक समता, समरसता, सौहार्द, स्वातंत्र्य आणि बंधुता यासह भारतीय भाषांच्या माध्यमातून समाजाची प्रगती होऊ शकते, असा संकल्‍प करणार्यांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

अटलजींच्या स्मृतीप्रित्यर्थ इमारतीची उभारणी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्‍सवानिमित्‍त चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने वसतिगृहाचे उद्घाटन हा सुवर्ण सुरभि संयोग होय असेही ते म्‍हणाले. उपराष्ट्रपती यांचे स्वागत कुलगुरूंचे प्रतिनिधी दूरशिक्षण निदेशालयाचे संचालक डॉ. के. बालराजू यांनी भौतिक रूपाने विद्यापीठाचे स्मृती चिन्ह, शाल आणि सूतमाला देऊन केले.

कार्यक्रमाचे संचालन कुलसचिव कादर नवाज खान यांनी केले तर आभार प्रकुलगुरू प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल यांनी मानले. यावेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडस ऑनलाईन तर विधान परिषदचे सदस्य डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा परिषदेच्‍या अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विद्यापीठातील अनेक मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.

Previous articleभंडारा जिल्ह्यात कोट्यवधीच्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांची हकालपट्टी करण्याची मागणी
Next articleमाय गेली! : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने निधन, आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).