Home Nagpur #NAGPUR | ओमायक्रॉनवर आत्ताच काही बोलणे हे रहस्यकथेसारखे होईल : डॉ ....

#NAGPUR | ओमायक्रॉनवर आत्ताच काही बोलणे हे रहस्यकथेसारखे होईल : डॉ . गंगाखेडकर

472

दक्षिण आफ्रिकेतून उगम असलेला नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट घातक आहे वा सौम्य याचा कोणताही सबळ वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे ऐकीव माहितीवर वा अफवांवर विश्वास न ठेवता उगाच पॅनिक होण्याची गरज नाही. घाबरून न जाता वेगाने लसीकरण करून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ . रमण गंगाखेडकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना केले. डेल्टासारख्या खतरनाक विषाणूवर आपण मात केली. यावरही करू, असे ते म्हणाले.

कोरोनाचा विषाणू नवनवीन व्हेरिएंट तयार करणारच हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण त्याच्या प्रजननासाठी लागणारे एंझाइन्स चांगल्या प्रतीचे नसल्यामुळे म्युटेशन होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक म्युटेशन विषाणूच्या फायद्याचे नसते. काही म्युटेशन गर्भपातासारखे अयशस्वी होतात. बहुतांश म्युटेशन्स विषाणूच्या फायद्याचे नसतात. परंतु त्याच्या एंझाइन्समुळे एखादे म्युटेशन विषाणूला फायद्याचे ठरू शकते.

दर पंधरा दिवसाला विषाणूमध्ये एक म्युटेशन होऊ शकते, असे गंगाखेडकर म्हणाले. वुहान विषाणूनंतर डी-६१४ विषाणू आला. त्याचा सर्वत्र संसर्ग झाला. त्यानंतर अल्फा, बीटा व डेल्टा विषाणू आला. दर चार-सहा महिन्यांनी एक कुठलातरी नवीन म्यूटंट येणारच आहे. आपण काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे, असे ते म्हणाले.

आपण घेतो ती व्हॅक्सिन फर्स्ट जनरेशनची आहे. नंतर सुधारित आवृत्तीच्या व्हॅक्सिन या सेकंड जनरेशनच्या असतात. काेरोना संसर्ग झाल्यानंतर माणसाला दवाखान्यात भरती होण्याची गरज पडत नाही वा तो मृत्युमुखी पडण्याची शक्यता कमी होते हे व्हॅक्सिन घेण्याचे फायदे आहे. व्हॅक्सिन घेतल्यानंतर झालेला संसर्ग लक्षणेविरहित वा सौम्य असतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल हाेण्याची गरज नसते, असे गंगाखेडकर म्हणाले.

दर वेळेला नव्याने तयार होणाऱ्या व्हेरिएंटमध्ये एक विलक्षण ताकद असते. विषाणूला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना बाधित करायचे असते. ओमायक्राॅन या व्हेरिएंटमध्ये ही ताकद आहे की नाही, याचा अभ्यास व्हायचा आहे. यापूर्वीच्या डेल्टाची जागा ओमायक्राॅन घेईल अशी शक्यता आहे. परंतु अमुकच एक शक्यता खरी ठरेल याची शाश्वती नसते. भारतात म्युटेशनची शक्यता कमी होत चालली आहे, असे ते म्हणाले.

ओमायक्राॅनबद्दल अजून आपल्यालाच नव्हे तर जगालाही काहीही माहिती नाही. त्यामुळे अंदाज करता कामा नये. बूस्टर डोस हवा की नको, याने खूप मृत्यू होतील, ही व्हॅक्सिन काम करीत नाही असे म्हणता कामा नये. अज्ञान असताना सत्य सांगणे जरुरी आहे. विज्ञान आणि कायदा पुराव्याच्या आधारे चालते. आणि सध्या तरी ओमायक्राॅनबद्दल कोणताही वैज्ञानिक सबळ पुरावा नाही, असे गंगाखेडकर म्हणाले. विषाची परीक्षा घेण्याऐवजी आपण व्हॅक्सिन घेणे आणि काेरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

ओमायक्राॅनबद्दल अंदाज नको : ओमायक्राॅन नवा व्हेरिएंट आहे. त्याच्याबद्दल आपल्याला थोडे दिवस थांबल्यावरच काही कळू शकेल. त्याच्याबद्दल आताच काही सांगणे घाईचे ठरेल. ओमायक्राॅनबद्दल सध्या अनिश्चितता आहे, त्याच्याबद्दल फारसे माहिती नाही तसेच संशोधनही झालेले नाही. अशा वेळी आपण अंदाजावर चित्र तयार करू नये. असे केल्यास ते रहस्यकथेसारखे होईल, असे गंगाखेडकर म्हणाले.

Previous articleसंजय राउत यांचे नेतेच बदलले! आता सोनिया, राहुल आणि प्रियंका हेच त्यांचे नवीन नेते
Next articleआणखी 7 जणांना ओमायक्रॉनची लागण, राजस्थानातील एकाच कुटुंबातील 9 सदस्यांना नव्या व्हेरिएंटची लागण; देशात एकूण 18 प्रकरणे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).