Home मराठी उद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, ही तर महा विश्वासघातकी आघाडी सरकार :...

उद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, ही तर महा विश्वासघातकी आघाडी सरकार : जावडेकर

551
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज दोन वर्षांचा यशस्वी कालावधी पूर्ण केला आहे. राज्यात भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन झाली. ही आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपने आघाडी सरकार कोसळेल असे अनेकदा भाकित केले.

मात्र दोन वर्षात भाजपला अपयश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीतील नेते भाजपवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यावर आता भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामवार जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे ही अपघाती मुख्यमंत्री झाले आहेत. असे टीकास्त्र जावडेकरांनी सोडले आहे.

ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री

प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहे, राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात देखील जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगू लागला आहे.

महा विश्वासघातकी आघाडी

मी नवे नाव देत आहे, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असे म्हणत जावडेकारांनी ठाकरे सरकारचे पुन्हा नव्याने नामकरण केले आहे. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिले, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली. असे नाव न घेता जावडेकरांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री 6 महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असे कोणते राज्य आहे? असा सवाल करत जावडेकरांनी सरकारला धारेवर धरले. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

चंद्रकांत पाटलांची टीका

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. यावेळी पाटील यांनी सुरूवातीलाच 100 कोटी वसुली प्रकरणावरून राज्य सरकारला घेरले.

ते म्हणाले की, ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात जबाबदारी होती, त्याच राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. अटकेच्या भीतीने लपवावे लागले. आता ते सीबीआयच्या कोठडीत आहे. सचिन वाझे निलंबित असताना त्याला सेवेत घेण्यात आले. वाझेला पुन्हा सेवेत घेण्याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत’, अशी जहरी टीका पाटलांनी केली.

‘कोरोनाच्या काळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, कोरोनासाठीच्या उपाययोजनासाठीच्या 600 कोटींचा निधी तिजोरीत पडून आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार केंद्राकडेच बोट दाखवत असते. लस म्हटले की केंद्र, व्हेटिंलर म्हटले की केंद्र… मग या सरकारची जबाबदारी नेमकी आहे तरी काय? त्यामुळे कोरोनासह सर्वच विषयात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे लोकांना ज्या-ज्या वेळेला संधी मिळेल, त्यावेळी लोक हे सरकार फेकून देतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

नाव न घेता धनंजय मुंडेवर टीका

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकूण मंत्रिमंडळातील एकचतुर्थांश मंत्री हे कुठल्या ना कुठल्या आरोपामुळे चौकशीच्या फेऱ्यात आहे. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. ज्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, ते राजीनामा देत नाहीत. कुणावर दुसऱ्या महिलेशी 15 वर्ष संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

त्या महिलेला त्या मंत्र्यापासून दोन मुले झालेली आहेत. ते सगळे प्रतिज्ञापत्रात नाही. त्यामुळे दोन वर्षात प्रत्येक गोष्ट ढकलायची, असे या सरकारचे सुरू आहे. पुढे पाटील म्हणाले की, जे मोगलांच्या काळात होते. तसेच आता खुलेआम मोगलाई सुरू आहे. एसटीचा संप चिरडून काढला. 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही जणांचे तर निलंबित केल्याच्या धक्क्याने मृत्यू झाले आहेत. असेही पाटील यावेळी म्हणाले.

Previous articleविधान परिषद् चुनाव | बढ़ सकती है कांग्रेस प्रत्याशी रवींद्र भोयर की परेशानी
Next articleविधान परिषद निवडणूक | छोटू भोयर यांनी बँकेचे 348 लाख बुडविल्या प्रकरणी नोटिस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).