Home Covid-19 #Covid । मास्क म्हणून रुमाल वापराल तर 500 रुपये दंड; संपूर्ण लसीकरण...

#Covid । मास्क म्हणून रुमाल वापराल तर 500 रुपये दंड; संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच सार्वजनिक ठिकाणी जाण्याची मुभा

374
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. शनिवारी शासनातर्फे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे मास्कऐवजी तोंड रुमालाने झाकल्यास तो मास्क म्हणून गृहीत धरले जाणार नाही. रुमाल लावलेल्या व्यक्तीस ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे मास्क लावणे आणि विवाह सोहळे, सभा-संमलेनांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास संपूर्ण लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.

संपूर्ण लसीकरण आवश्यक तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणाऱ्या व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (उदा. खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल, अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्रदेखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दंड 

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे. अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त अशा संस्था किंवा आस्थापनांनासुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रुपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल तसेच सेवा पुरवणारे वाहनचालक, मदतनीस किंवा वाहक यांनादेखील रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

कार्यक्रमांत क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी

कोणताही कार्यक्रम, समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधांमध्ये चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढवता येतील, परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत.

प्रवास : राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

संपूर्ण लसीकरण म्हणजे काय?

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे.

Previous article#Maharashtra । ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची दहशत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
Next articleविधान परिषद् चुनाव | बढ़ सकती है कांग्रेस प्रत्याशी रवींद्र भोयर की परेशानी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).