
मुंबई ब्युरो : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे…. आत्मविश्वासाच्या बाबतीत त्यांची चारही बोटे शुद्ध तुपात आहेत. महाराष्ट्राचं सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच, असा पुनरुच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त केला आहे.
विरोधकांचा आत्मविश्वास साफ तुटलाय
महाराष्ट्रातील विरोधी पक्षास नक्की काय झाले आहे तेच कळत नाही. महाराष्ट्रातील सरकार ‘पाडू’च असा त्यांचा आत्मविश्वास साफ तुटला आहे. आता सरकार पाडणार नाही, तर आपल्याच ओझ्याने पडेल, असे पसरवायला त्यांनी सुरुवात केली आहे. विरोधकांनी ‘पाडू किंवा पडेल’ असे कितीही ढोल बडवले तरी यापैकी काहीच घडणार नाही.
शरद पवार आनंदी आहेत
शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटले. दोघांत चांगले तासभर ‘गुफ्तगू’ झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे! त्यांच्या प्रमुख नेत्यांची अवस्था आत्मविश्वासाच्या बाबतीत चारही बोटे शुद्ध तुपात अशीच असल्याने तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार श्रीकृष्णाच्या कुरुक्षेत्रावरील रथाप्रमाणे सगळे बाण व हल्ले पचवत विरोधकांशी लढत आहे.
…तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा
उद्धव ठाकरे हे मध्यंतरी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल. ठाकरे-मोदी भेटीत असे काय घडले, की ज्यामुळे समस्त ‘मीडिया महामंडळा’ने धावाधाव करावी व नव्या सरकारनिर्मितीच्या तारखांचे हवाले देत राहावे?
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याला भाजप जबाबदार
ठाकरे यांनी एक बात तर पंतप्रधानांशी नक्कीच केली असेल, ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचीच आहे. भाजपने शिवसेनेस या परिस्थितीत ढकलले नसते तर आजचे सरकार आलेच नसते. ठाकरे-मोदी भेटीत यावर नक्कीच चर्चा झाली असावी. त्यामुळे आजच्या सदाबहार राज्यव्यवस्था निर्मितीस हातभार लावल्याबद्दल भाजपचे आभार मानावे तेवढे थोडेच!
विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झालं…
मंगळवारच्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्राच्या मधोमध नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू हेऊ देऊ नये म्हणजे झाले, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.