Home मराठी समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती सर्वदूर पोहचवा -डॉ. प्रशांत नारनवरे

समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती सर्वदूर पोहचवा -डॉ. प्रशांत नारनवरे

समाजकल्याण विभागात सामाजिक न्याय दिन साजरा

नागपूर ब्युरो : समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गरजूंपर्यत पोहचणे म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली होय, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

मानव जातीच्या कल्याणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान फार मोठे आहे. असे सांगून डॉ. नारनवरे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायावर आधारित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. त्यांनी त्या काळात अनेक अनिष्ट चालिरिती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनांशी निगडीत क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविलीत. खऱ्या अर्थाने ते ‘सामाजिक न्यायाचे अग्रदूत’ होते. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सामाजिक न्याय विभागाच्या योजना राबविण्यासाठी शासनाचे इतर सर्व विभाग हे साखळी पध्दतीने काम करीत असतात. या विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी इतर विभागातील अधिकाऱ्यांशी या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करुन त्याचे योग्य नियोजन करावे. आपण समाजकल्याण विभागात कामाला आहोत, ही आपल्यासाठी समाजामध्ये समता प्रस्तापित करण्याची सुवर्ण संधी आहे. या संधीचा उपयोग करुन समाजासाठी चांगले कार्य करा. आपल्या विभागातील योजनांना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा. कार्यालयात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपआपले काम प्रामाणिकपणे केले तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेला समाज निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्री. नारनवरे यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषण करताना श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला थोर समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये ‘कल्याणकारी राज्या’ची स्थापना केली. दिव्यांग, सामाजिक न्यायाची गरज असणारे समाजातील वंचित घटकांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्याच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजातील विविध घटकांमधील दरी कमी करण्याचे महत्त्वाचे काम समाजकल्याण विभागामार्फत होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करुन लाभार्थ्यांना किती लाभ झाला, याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. समाजपयोगी योजनांचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत व्हावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाची गरज असल्याचे प्रतिपादन राधाकृष्णन बी. यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ‘आपत्ती व्यवस्थापन गुरू’ म्हणून ओळखल्या जाते. 122 वर्षांपूर्वी देशात प्लेग व दुष्काळामुळे दहा लाख नागरिक मृत्यूमुखी पडले. अशा साथरोग आपत्तीच्या काळात शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील साथरोग नियंत्रणात राहीला. यावरुन महाराजांची दूरदृष्टी बघायला मिळते. सध्याच्या कोरोना-19 काळात राजर्षी शाहू महाराजांचे विचार अंगीकारून या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत श्री. गायकवाड यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली. नागपूर जिल्ह्यात एकूण 25 मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, नोकरी करणाऱ्या महिलांचे एक वसतिगृह तसेच दोन शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगर पालिका क्षेत्रात एकूण 929 लाभार्थ्यांना व नगरपालिका क्षेत्रात एकूण 1 हजार 12 लाभार्थ्यांना व ग्रामीण क्षेत्रात 9 हजार 111 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत एकूण 2 हजार 29 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये एकूण 123 बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ‘स्टॅन्डअप इंडिया मार्जीन मनी’ ही योजना सन 2020-2021 पासून नव्याने सुरू झालेली असून यामध्ये 17 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल शंभरकर यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी जयश्री धवराळ यांनी मानले.

Previous articleवादाऐवजी संवादावर भर देणारा, समाजाचा चोहोबाजूंनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleNagpur । अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).