महिला व बालकल्याण समितीचा निर्णय
नागपूर ब्यूरो: महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांना शिवणकाम, कुकींग, ब्यूटीशियन, मेहंदी क्लासेस, संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण दिले जाईल. हा निर्णय महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभेत बुधवारी घेण्यात आला. ऑनलाईन सभेमध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्याताई धुरडे, सदस्या सोनाली कडु, प्रणिता शहाणे, स्नेहा निकोसे आणि मंगला लांजेवार यांनी भाग घेतला. समाज विकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर आणि समाज विकास अधिकारी दिनकर उमरेडकर उपस्थित होते.
धुरडे यांनी सांगितले की, महिलांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे. जर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले तर त्याचा लाभ त्यांच्या कुटुंबाला होईल. प्रत्येक प्रभागात महिलांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल. नवीन आर्थिक वर्षात महिलांना शिवणयंत्र सुध्दा देण्यात येईल. समिती तर्फे प्रत्येक झोनमध्ये बचत गटाचा महिलांसाठी पोटोबा (कॅन्टीन) ची जागा उपलब्ध करण्याचे निर्देश समाज विकास विभागाला देण्यात आले. धुरडे यांनी दिव्यांगांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळामध्ये दुरूस्ती करण्याचेही निर्देश दिले. अर्थसहाय्य योजनेमध्ये ज्या दिव्यांगांचे स्वत:चे घर नाही त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे स्वत:चे घर असावे ही अट शिथिल करुन नागपूरचा रहिवासी असावा, अशी अट टाकण्याचे निर्देश सभापती दिव्याताई धुरडे यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.