Home Health Akola | धर्म जातीच्या भिंती तोडून माणूसकी जपणारे जावेद जकारिया

Akola | धर्म जातीच्या भिंती तोडून माणूसकी जपणारे जावेद जकारिया

‘ तू ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू , इंसान बनेगा’ किंवा ..’ घर से मस्जिद है बहुत दूर, कही यू करले, किसी रोते हुए बच्चे को हँसाया जायें” धर्माच्या नावाने स्तोम माजविणा-यांना सणसणीत चपराक देणा-या या काव्यपंक्ती.

जाती-धर्माच्या भिंतीच्या पलिकडे जाऊन माणुसकी, मानवतेच्या कक्षा दृढ, समृद्ध करणारं काम जावेद झकारिया आणि अकोल्यातील “कच्छी मेमन जमात” करतेय. अकोल्यातील जावेद हे कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’चे अध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य पातळीवर अल्पसंख्यंक समाजाचे प्रमुख नेते आहेत. ‘जनसेवा’ हीच ‘अल्लाहची इबादत’ असल्याचे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून ते व त्यांची संघटना कार्यरत आहेत.

गेले वर्षभरापासून जगाला कोरोना नावाच्या संकटाने ग्रासलं आहे. प्लेग नंतर पहिल्यांदाच माणसं एकमेकांपासून दूर अलिप्त राहू लागलीत. या कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, आरोग्यसेवक हे माणसांसाठी देवदूत ठरलेत. अशातच महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातही कोरोनाने हातपाय पसरत माणसांना आपल्या विळख्यात जखडतं काहींना गिळंकृत केलं. या गिळंकृत म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार पार पडण्याचे जिकरीचे काम आले ते अकोला पालिका व जिल्हा प्रशासनासमोर. त्यांना या कामात मदत करतेय जावेद जकारिया आणि त्यांचा चमू.

 

मृत्यू हा मानवाच्या आयुष्यातील अंतिम प्रवासाचा क्षण. या प्रवासाचे साक्षीदार होणे हा माणुसकीचा धर्म. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांसाठी मानव हा धर्मच विसरला. मात्र कोरोनामुळे माणसा माणसात दुरावा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू आल्यास त्याच्या जवळही जाण्याचे धाडस कुणी दाखवत नाही. ही भयावह स्थिती आजपर्यंत कुणीही अनुभवली नाही. मृत्यूनंतर जेथे कुणी कुणाबद्दल वाईटही बोलत नाही, तेथे आता त्यांच्या अंतिम प्रवासात चार पावलेही कुणी चालायला तयार नाही. जवळचे आप्त, मित्रमंडळही शासन निर्बंधाचे कारण करीत पुढे येण्यास तयार नाही. संसर्गामुळे मृत्यू झालेल्या घरातील सदस्य विलगीकरणात असल्याने त्यांना अंतिम संस्कार करणे शक्य होत नाही. शासकीय नियमानुसार नातेवाईकांशिवाय इतर कोणालाही संस्काराची परवानगी दिली जात नाही. अशा परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कच्छी मेमन जमातचे जावेद जकारिया व त्यांची चमू हे मृतकाचे आप्त होऊन त्यांच्या धर्मानुसार त्यांचे अंत्यविधी पार पाडत आहेत. त्यांचे हे कार्य मानव जातीसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

अशी झाली कामाची सुरूवात

गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील ही गोष्ट. 7 एप्रिल 2020 रोजी जकारिया यांनी त्यांच्या संघटनेच्यावतीने अकोला जिल्हा रूग्णालयाला 31 गमबूट दान केले. तेव्हा रूग्णालयाने एक वॉटर कूलर भेटीदाखल देण्याची विनंती केली. जावेदभाई सांगत होते 11 एप्रिल हा दिवस मेमन दिवस म्हणून साजरा केला जातो. या पवित्र दिवशी आम्ही वॉटर कूलर भेटीदाखल द्यायला गेलो तेव्हा आसाममधील एक तरूण जेहरूल इस्लामने अकोल्यात आत्महत्या केल्याचे कळले. त्याला कोरोना झाला होता. त्याचे कुणीही नातेवाईक अकोला जिल्ह्यात नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची तयारी आम्ही दाखवली. अर्थात हे तितके सोपे नव्हते. आम्हाला त्यासाठी आसाम सरकार व आसाममधील या तरूणाचे कुटुंबिय यांची अनुमती मिळवावी लागली. गेल्यावर्षी कोरोनाची दहशत अशी होती की कोरोनाने मृत्यू पावलेल्या घरातील सदस्यावर अंत्यसंस्कार करायलाही कुणी तयार होत नव्हते. कोरोनाने गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी पाठवला जायचा. अनेकदा घरातील एकही सदस्य कोरोना होईल या भीतीने स्मशानभूमूत यायला तयार होत नव्हता. त्यावेळेस या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत आप्तस्वकीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेल्या सर्वधर्मियांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी जावेदभाई आणि त्यांच्या नेतृत्वातील 10 सदस्यांनी स्वीकारली. त्यांच्या या अग्निदिव्याला त्यांच्या घरच्यांचाही विरोध होता. मात्र तरीही ते आपल्या सेवाभावी निर्णयावर ठाम राहिले. एप्रिल-मे 2020 या दोन महिन्यातच त्यांनी 60 लोकांवर अंत्यसंस्कार केले. त्यापैकी बहुसंख्य मृत व्यक्ती हे हिंदू होते.

गेल्यावर्षी त्यांची संघटना व त्यांचे हे कार्य प्रसिद्धीच्या झोतात आले त्याला एक घटना कारणीभूत ठरली. गेल्यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका 78 वर्षीय हिंदू व्यक्तीवर त्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केला त्यानंतर जावेद आणि त्यांची कच्छी मेमन जमात ही सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. “एक 78 वर्षांचे वृद्ध त्यांच्या पत्नीसोबत राहत होते. त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याच काळात त्यांना ह्रदयविकाराचा धक्का आला आणि 23 मे 2020 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा एकूलता एक मुलगा दुस-या दिवशी नागपूरहून अकोल्यात आला. मात्र त्याने कोरोनाच्या भीतीने आपल्या वडिलांचा अंत्यविधी करायला नकार दिला. कितीही समजूत घातल्यानंतर मुलगा तयार होत नसल्याने अखेर अकोला मनपाने आम्हाला संपर्क केला. त्यानंतर आम्ही हिंदू पद्धतीने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले,” असे जकारिया यांनी सांगितले. त्या काळात या प्रकरणाची राज्यभर खूप चर्चा झाली होती. आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करायला नकार देणारा हिंदू मुलगा आणि रक्ताचे काहीही संबंध नसताना अंत्यसंस्कार करणारे मुस्लिम तरूण, ही बातमी तेव्हा सर्वत्र प्रसिद्धही झाली होती.

झकेरिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी जात-पात, धर्म न पाहता हा माणुसकीचा धर्म जपलाय. नैसर्गिक व कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचे वारसदार होत गेल्यावर्षी 12 एप्रिल 2020 पासून आजवर 1 हजार 310 जणांवर त्यांनी विधिपूर्वक अंतिम संस्कार केलेत. यापैकी 1100 लोक हे हिंदू होते. जावेद जकारिया यांना या कामात तनवीर खान, समीर खान, सैयद नदीम, वसीम खान, महफूज खान, सबीर कुरेशी, अज़ाज़ अहमद, आसिफ अहमद खान, मनपा अधीकारी प्रशांत राजूरकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

अविरत समाजसेवा

कोरोनाच्या संकटात कच्छी मेमन जमातने संकटग्रस्तांच्या मदतीसाठी सेवाभावी कार्याचा वसा हाती घेतला आहे. यात कोरोना वॉर्डात वॉटर कुलर, कर्मचाऱ्यांना गमबूट, सफाईसाठी फिनाईल, ग्लास, खाद्यपदार्थ, वाहतूक पोलिसांना हँड ग्लोव्हज, सफाई कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, बैदपुरा आणि खैर मोहम्मद प्लॉटमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन, गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप आदी सेवाभावी कार्य कच्छी मेमन जमातच्या वतीने जावेदजी करत आहेत.

कोरोना बाधितांच्या सेवेत दोन रुग्णवाहिका

कोरोना आजाराविषयी जनमाणसात एवढी भीती निर्माण झालेली आहे, की त्यांच्या जवळापासही कोणी फिरकत नाही. अशा परिस्थितीत जावेद यांनी पुढाकार घेत दोन रुग्णवाहिका कोरोना बाधितांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील एक रुग्णवाहिका संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात दाखल करते तर दुसरी मृतांना रुग्णालयातून स्मशानभूमी किंवा कब्रस्थानपर्यंत पोहोचविण्यासाठी वापरली जात आहे. विशेष म्हणजे, या रुग्णवाहिकांवरही त्यांच्या संघटनांचेच सदस्य सेवा देत आहेत.

पुरस्कारांनी सन्मान

शिक्षण महर्षी, कृषी रत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव समितीने कोरोना संकटकाळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्काराचे अमूल्य कार्य केल्याची नोंद घेत जावेद जकारिया व त्यांच्या टीमचे डॉ. पंजाबराव देशमुख समाजवीर पुरस्कार देऊन सन्मान केला.

“आम्ही स्वतः सकाळी सरकारी रूग्णालयात पोचतो आणि कोरोना मृतांची नावे माहित करतो त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी सपर्क साधतो. पीपीई किट घालून आम्ही मृतदेहाचा ताबा घेतो. मृतदेह थेट स्मशानभूमी वा कब्रस्तानात नेला जातो. अनेकदा जागा नसल्यामुळे आम्हाला दोन-तीन स्मशानभूमीत जावे लागते. गेल्यावर्षीपेक्षा ही लाट भयानक आहे. यावर्षी  50 वर्षांखालील मरणा-या लोकांची संख्या मोठी आहे. गेल्यावर्षी 2 रूग्णवाहिका पुरेशा होत्या यावर्षी 4 रूग्णवाहिकांची गरज पडतेय. 20 व  21 एप्रिल 2021 या दोन दिवसात  51 कोरोना पॉझिटिव्ह मृतांवर अंत्यसंस्कार आम्ही केले,” असे जकारिया यांनी सांगितले.

रमजान आणि ईदच्या दिवशीही सुरु ठेवले कार्य 

यावर्षी रमजान मधे दिवसभर जेवण-पाणी न घेता जीव गुदमरणा-या पीपीई किटमध्ये राहून एकेका दिवशी 20 ते 30 लोकांचे अंत्यसंस्कार करण्याचे अत्यंत कठीण कार्य जावेद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. एवढेच नव्हे ईदच्या दिवशीही जावेद जकारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले हे सेवा कार्य सुरु ठेवले. गेले वर्षभर हे काम करीत असताना स्वतः जकारिया व त्यांच्या सहका-यांना कोरोना झाला. रूग्णवाहिका चालवणा-या वाहकांना कोरोना झाला तरी कुणीही या कामातून माघार घेतली नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माणूसकीचे हे काम करणा-यांना मनापासून सलाम.

– प्रमोद चुंचूवार (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
Previous articleNagpur | ‘बारामती ॲग्रो’ कडून 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनपाकडे सुपूर्द
Next articleNagpur | मोहगाव झिलपी तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).