Home Health Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॅाकडाऊन?

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा नवा लॅाकडाऊन?

मुंबई ब्यूरो : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज यासंदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. काल (शनिवारी) राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पार पडली.

सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

…15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर : मुख्य सचिवांचा इशारा

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. शनिवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.

आम्ही राजकारण बंद करतो पण… : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, आम्ही सहकार्य करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार व्हावा. पूर्ण नुकसान भरपाई नको पण ही लोकं जगली पाहिजे याचा विचार व्हावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, कोरोना रिपोर्ट तातडीनं मिळावेत म्हणजे प्रसार कमी होईल. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. राज्यानं हस्तक्षेप करावा. परराज्यात, परदेशात जाणारे रेमडेसिवीर रोखलं पाहिजे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा,ऑक्सिजन बेड उपलब्ध करा, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, राजेश टोपेंचं आवाहन

बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले.

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय. त्यात शनिवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल (शनिवारी) राज्यात तब्बल 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण 27,48,153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 % एवढे झाले आहे.

राज्यात काल 309 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर 1.72% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबई महानगरपलिका क्षेत्रात आज 9330 रुग्णांची नोंद आज झाली आहे.

Previous articleगडकरी ने किया एक कॉल और नागपुर को मिले 5 हजार रेमडेसिवर इंजेक्शन
Next articleNagpur । ऑक्सीजन बेड और रेमडेसिविर की कमी को लेकर डॉक्टरों ने दिया धरना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).