Home मराठी Nagpur । वीकेंड लॉकडाऊनमुळे नागपुरातील रस्ते सामसूम

Nagpur । वीकेंड लॉकडाऊनमुळे नागपुरातील रस्ते सामसूम

नागपूर ब्युरो : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी नागपुरातील रस्ते सामसूम झालेले दिसले. शुक्रवारी रात्री पासूनच नागपुरात जागो जागी पोलिसांनी नाकाबंदी सुरु केल्याने शहरात रात्रीपासूनच सामसूम झाले. एकीकडे लसीकरण सुरू असताना लॉकडाऊनचे नेमके नियम काय असतील, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन असला तरी नागपुरातील सर्वच लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. नागरिकांना नोंदणीचा मेसेज दाखवून प्रवास करता येणार आहे.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पण वाहतुकीची साधने जसे की, रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर हॉटेलमधून होम डिलिवरी सुरू राहील.

वीकेंड लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडण्याचं नागरिकांनी टाळायला हवं. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा नागरिकांना विना कामाने घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.

5 एप्रिल रात्री 8 वाजता पासून 30 एप्रिलपर्यंत राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र उपहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळपर्यंत दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.