नागपूर ब्यूरो: परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेंना पुन्हा नियुक्त केलं, असं शरद पवारांनी सांगितलं. पण त्यांनी सांगितलं ते अर्धसत्य होतं. परमबीर सिंग यांच्याच कमिटीने सचिन वाझे यांची नियुक्ती केली पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने केली, हे सांगायला शरद पवार विसरले, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला आहे. इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, यासह अनेक गंभीर आरोप परमबीर यांनी या पत्रात केले. या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही गौप्यस्फोट केले आहेत.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
‘अंबानी स्फोटकं प्रकरणाची केंद्रानं योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल’
गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
तसंच, सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमवीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15- 20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराच फडणवीसांनी दिला आहे.