Home कोरोना Nagpur । कोरोना साखळी तोडण्यासाठी नागपूर शहरात आजपासून सात दिवस लॉकडाऊन

Nagpur । कोरोना साखळी तोडण्यासाठी नागपूर शहरात आजपासून सात दिवस लॉकडाऊन

नागपूर ब्युरो : नागपूर शहरामध्ये दररोज दोन हजारावर कोरोना बाधित पुढे येत आहेत. शहरामध्ये ही संख्या संसर्गातून वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने 15 ते 21 मार्च काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित केला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्वतः सोबत कुटुंब व समाजाच्या आरोग्यासाठी सर्वांनी उद्यापासून सुरू होत असलेल्या कोरोना साखळी तोडण्याच्या लॉकडाऊनला पाठिंबा द्यावा, घराबाहेर पडू नये, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

सोमवारी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवार ला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला.

लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन आवश्यक

सोमवार पासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनला सर्व स्तरातील नागरिकांनी, व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, कामगार, रोजंदारी कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पुढील सात दिवसांमध्ये काटेकोरपणे आम्ही लॉकडाऊनचे पालन केल्यास शहरातील हॉटस्पॉट बनलेल्या अनेक वस्त्यांमधील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. ही संख्या कमी होणे यावर पुढील लॉकडाउनचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये. अमरावती येथे लॉकडाऊन सुरू केल्यानंतर तेथील परिस्थिती सुधारली आहे. हीच अपेक्षा नागपूरमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

  • लॉकडाऊनला जनतेने सहकार्य करावे : डॉ. नितीन राऊत
  • जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय सर्व दुकाने बंद ठेवणार
  • विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासन करणार कारवाई

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी देखील सोमवार पासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये शहरालगतच्या तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागपूर लगतच्या कामठी शहरातील जुने व नवीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे जसे हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीचा समावेश करण्यात आला. या संपूर्ण हद्दीमध्ये संचारबंदी कायम राहणार आहे. त्यामुळे उद्यापासून सात दिवस नागपूर शहरात ग्रामीण भागातून प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामीण भागामध्ये सायंकाळी सहा वाजता पासून दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊन काळात नागपूर महानगर व नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या भागांमध्ये संचारबंदी राहणार आहे. मात्र कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने ग्रामीण भागात ही वाढ झाल्यास या ठिकाणी सुद्धा संचारबंदीचा विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये आणि विनाकारण नागपूर शहरामध्ये प्रवेश करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार पासूनच्या बंदमध्ये सर्व व्यावसायिकांनी, दुकानदारांनी विविध छोट्या-मोठ्या उद्योगात सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांनी, व्यापक जनहितार्थ लॉकडाऊला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक

लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग सुरु राहतील. मात्र, सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तर शासकीय कार्यालयांमध्ये 25 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, ज्या खासगी व शासकीय आस्थापनांमध्ये 31 मार्च या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या कालावधीतील महत्त्वपूर्ण कामे सुरु असतील, त्या ठिकाणी आवश्यक कर्मचाऱ्यांची मर्यादित उपस्थिती ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय, पॅरामेडिकल व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. प्रसारमाध्यमांसाठी कामे करणाऱ्या प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक असेल.

ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी

या कालावधीत मद्यविकी दुकाने बंद राहतील. मात्र, ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. शहर व ग्रामीण भागात 128 केंद्रांवर ज्येष्ठांचे कोविड लसीकरण सुरु आहे. लसीकरण मोहीम या कालावधीतही सुरु राहील. तथापि, लसीकरण केंद्रापर्यंत ज्येष्ठांना पोहचविण्यासाठी या कालावधीत लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

अत्यावश्यक सेवा सुरु

अत्यावश्यक सेवा बँक, पोस्ट, मेडिकल स्टोअर्स, शासकीय व खासगी रुग्णालये, डोळ्यांचे रुग्णालये, चष्माविक्री केंद्र सुरु असतील. फळे, भाजीपाला, मांस, मासे, दूध, अंडी आदि विक्री करणारी दुकाने सुरु राहतील. मात्र सकाळीच अत्यावश्यक गरजांची पूर्तता करून नागरिकांनी घरातच राहावे, असेही देखील करण्यात आले आहे शक्यतो पुढील सात दिवसांसाठी घराबाहेर निघावे लागणार नाही या पद्धतीने नियोजन करण्याबाबतही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleMaharashtra | माओवादियों का निषेध करें, सी 60 जवानों का अभिनंदन करें
Next articleMaratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).