Home Finance महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय – आ. डॉ. परिणय फुके

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय – आ. डॉ. परिणय फुके

नागपूर ब्युरो : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भातील जनतेवर मोठा अन्याय केला असून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा गंभीर आरोप भंडारा आणि गोंदियाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदविताना डॉ. फुके यांनी सांगितले की, सरकारने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिली गेली नाही.

सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठलीही मदत या अर्थसंकल्पात दिलेली नाही. गोसीखुर्द प्रकल्पासाठी या सरकारने केवळ एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु याचवेळी पुण्या- मुंबईतील प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा भेदभाव कशासाठी? असा सवालही डॉ. फुके यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी गोसीखुर्द प्रकल्पाला भेट दिली तेव्हा या प्रकल्पासाठी भरीव मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती, हीच ती भरीव मदत आहे का? असा प्रश्न सुद्धा डॉ. फुके यांनी राज्य सरकारला विचारला आहे।
शेतमजुर तसेच इतर गरीब मजूर – कामगारांना कुठलीही मदत किंवा नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मागासवर्गीय तरुणांसाठी अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद नाही.

थोर समाजसेवक श्री. अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी अलीकडेच पार पडली. परंतु त्यांच्या स्मारकासाठी कुठलीही तरतूद या सरकारने केलेली नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात एक पैसाही निधी देण्यात आलेला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही. महाविकास आघाडी सरकारला विदर्भ आणि विशेषतः पूर्व विदर्भातील शेतकरी, मजूर आणि सर्व सामान्य नागरिकांचा विसर पडला, अशा शब्दात डॉ. फुके यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.