Home FILM #Maharashtra | तब्बल 19 महिन्यांनंतर मोठा पडदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

#Maharashtra | तब्बल 19 महिन्यांनंतर मोठा पडदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

531
मुंबई ब्यूरो : महाराष्ट्रात अखेर आजपासून चित्रपटगृहे सुरु होत आहेत. महाराष्ट्र सराकारने मागील महिन्यात चित्रपटगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर निर्मात्यांनी एकामागोमाग एक त्यांच्या रखडलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करायला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 19 महिने चित्रपटगृहांना टाळे लागले होते. पण आता दीर्घ कालावधीनंतर एकदा मोठा पडदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

औरंगाबाद येथे पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा रहस्यपट ‘चेहरे’ आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे गुरुवारी सर्वच चित्रपटगृहांत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेतल्याचे चित्रपटगृह मालकांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटानंतर मोठ्या पडद्याचे दर्शन प्रेक्षकांना घडले नाही. गेल्या वर्षी निम्म्या आसन क्षमतेसह परवानगी मिळाली हाेती. मात्र, त्यावर व्यवसाय करणे शक्य नसल्याने वितरकांनी नवे चित्रपटच प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे खुली करण्यात आलेली चित्रपटगृहे पुन्हा प्रेक्षकांविना सुनी झाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय कमी झाला आहे. शिवाय लसीकरण मोहीमदेखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे चित्रपट व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरीही बिग बजेट बहुचर्चित असलेले सूर्यवंशी, थालायवी आणि 83 हे चित्रपट दिवाळीनंतरच प्रदर्शित केले जाणार आहेत. आता ‘चेहरे’ हा रहस्यपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेल्या विमान अपहरणावर आधारित ‘बेल बॉटम’देखील मनोरंजन करण्यात महत्त्वाचा ठरेल, असे चित्रपटगृह व्यवस्थापक आणि मालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ही आहे नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी नियमावली
 1. प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही.
 2. जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
 3. कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
 4. मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक.
 5. प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
 6. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे.
 7. आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.
 8. कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
 9. 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
 10. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
अनेक दमदार चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

मागील दोन वर्षांपासून थिएटरमध्ये प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 हून अधिक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये 83, लालसिंग चड्ढा, शमशेरा अशा अनेक चित्रपटांची नावे सामिल आहेत. यात अक्षय कुमारचे सर्वाधिक म्हणजे 6 चित्रपट एकापाठोपाठ एक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

सूर्यवंशी, राधेश्याम यांची रिलीज डेट झाली जाहीर

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय ‘राधेश्याम’ ची रिलीज डेट 14 जानेवारी 2022 ही जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ‘तडप’ 3 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होईल. ‘चंदिगढ करे आशिकी’ हा चित्रपट यावर्षी 10 डिसेंबरला रिलीज होत आहे.

या आहेत मोठ्या चित्रपटांच्या रिलीज डेट्स
 1. बंटी और बबली 2- 19 नोव्हेंबर 2021- सैफ अली खान, राणी मुखर्जी
 2. सत्यमेव जयते 2- 26 नोव्हेंबर 2021 जॉन अब्राहम
 3. चंडीगढ़ करे आशिकी- 10 डिसेंबर 2021 आयुष्मान खुराणा, वाणी कपूर
 4. 83 -25 डिसेंबर 2021- रणवीर सिंह, दीपिका पदुकोण
 5. जर्सी -31 डिसेंबर 2021- शाहिद कपूर
 6. पृथ्वीराज -21 जानेवारी 2022- अक्षय कुमार, मानुषी छिल्लर
 7. लाल सिंह चड्‌ढा -14 फेब्रुवारी 2022- आमिर खान, करीना कपूर
 8. जयेश भाई जोरदार -25 फेब्रुवारी 2022- रणवीर सिंह, शालिनी पांडे
 9. बच्चन पांडे -4 मार्च 2022- अक्षय कुमार
 10. शमशेरा -18 मार्च 2022- रणबीर कपूर, संजय दत्त
 11. भूल भुलैया 2 -25 मार्च 2022- कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी
 12. KGF 2 -14 एप्रिल 2022- यश, संजय दत्त
 13. मेडे -29 एप्रिल2022- अजय देवगन, रकुल प्रीत
 14. हीरोपंती 2 -6 मे 2022- टाइगर श्रॉफ
 15. रक्षाबंधन -11 ऑगस्ट 2022- अक्षय कुमार, भूमी पेडणेकर
 16. रामसेतु -24 ऑक्टोबर 2022- अक्षय कुमार

#Nagpur | Inter School Quiz contest at JNARDDC under AKAM