Home Maharashtra Bhandara Hospital Fire | शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये...

Bhandara Hospital Fire | शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये – मुख्यमंत्री

699
  • भंडारा सामान्य रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी
  • राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे
  • संपूर्ण जळीत प्रकरणाची विशेष चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई
  • विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

नागपूर ब्यूरो : राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतांनाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केली.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटूंबियांसोबत संवाद साधला.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्या जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री डॉ. कदम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर वाचलेल्या बालकांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कुटूंबांना संपूर्ण मदत दिली जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय बंद राहणार नाही. तसेच ओपीडी नियमित सुरु राहिल यादृष्टीने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस दलाची मदत करण्यात येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणालाही अडवू नका, असे निर्देशही देण्यात आले आहे.

शिशू केअर युनिटला आग लागल्याचे माहिती पडताच फायर एक्स्टींग्विशद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली. शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयुमध्ये भरती असलेल्या दहा बालकांचा मृत्यु झाला तर सात बालकांना वाचविणे शक्य झाले.

आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांने प्रारंभी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्य झाले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीका यांनी तात्काळ बालकांना इतर वार्डात हलविले. तसेच नातेवाईकांना बालकांचे मृतदेह सूपुर्द करण्यात आले. तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम सुध्दा तात्काळ वितरीत करण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैधक तज्ज्ञांची टिम, इलेक्ट्रीकल निरीक्षक, व्हीएनआयटी,राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट देवून पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस. रहांगडाले यांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच आरोग्य सेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ञांचाही या समितीमध्ये समावेश असल्याचे माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. या समितीला आपला अहवाल तात्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीच्या अहवालानुसार आगीचे नेमके कारण शोधल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील इतर रुग्णालयातही या समितीने सुचविलेल्या सूचना लागू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना यापुढे घडणार नाही यासाठी उपाययोजनांचा शोध घेतांना ही आग कशामुळे लागली त्याची चौकशी करुन दोषींविरुध्द कठोर कारवाई करावी अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना नियमित उपचार सुरु रहावा तसेच जळीत वार्डाचे तात्काळ दुरुस्ती करावी, अशी सूचना केली.

Previous articleNagpur | इंदोरा में भव्य रक्तदान व स्वास्थ्य शिविर
Next articleBhandara Hospital Fire | शोकाकूल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).