Home हिंदी संजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन

संजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन

मुंबई ब्यूरो : विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांनी आपल्या ‘हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर’ या पुस्तकाचे प्रकाशन चक्क हेलिकॉप्टरमध्ये केलंय. व्यवसाय करताना तो कसा वाढवायचा आणि आपला ब्रॅन्ड कसा तयार करायचा याची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ‘अर्थसंकेत’ चे संस्थापक डॉ. अमित बागवे आणि रचना बागवे हे उपस्थित होते.

नवउद्योजक हे देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात. पण कोरोनाच्या महामारीने सर्व जगाच्या उद्यमशीलतेवर काही काळासाठी परिणाम झाला. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावतोय. कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून आलंय. या काळात नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागलेत, अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नवउद्योजकांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी आपण हे पुस्तक लिहल्याचं संजीव पेंढारकर यांनी सांगितलं.

‘ हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर’ या पुस्तकात अनेक उद्योगांच्या ब्रॅन्ड्सची, त्यांच्या निर्मीतीची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपला ब्रॅन्ड कसा निर्माण करावा, त्याचे महत्व टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, अडचणीच्या काळात आपला उद्योग कशा प्रकारे टिकून ठेवावा तसेच आपल्या ब्रॅन्डच्या विकासासाठी आणि प्रचारासाठी कशा पध्दतीच्या क्लृप्त्या वापराव्यात याची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

या पुस्तकाविषयी सांगताना संजीव पेंढारकर म्हणाले की, “हे पुस्तक तरुण नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांचा ब्रॅन्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहन देईल अशी आशा आहे. अर्थसंकेतचे अमित बागवे म्हणाले की, “संजीव पेढारकरांच्या या पुस्तकाचे एका अविस्मरणीय पध्दतीनं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्याचा लिम्का बुक ऑफ रेकार्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकार्ड्स मध्ये नोंद होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

गेली 45 वर्षे उद्योजकता क्षेत्रात मुशाफिरी केल्याने या व्यवसाय परिसंस्थेत मार्गक्रमण करणे किती आव्हानात्मक आहे हे संजीव पेंढारकर यांना माहित आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नवउद्योजकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल त्या गोष्टी ते निदर्शनास देण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून नवउद्योजकांचा प्रवास कमी गोंधळाचा आणि कमी त्रासदायक व्हावा असा त्यांचा हेतू आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here