नागपूर ब्यूरो : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतीपुरक उद्योगांना चालना दिल्याने विदर्भाचे अर्थचक्र गती पकडून येथील मागासलेपण कमी होण्यास मदत होणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामीण विकासात शिखर भूमिका निभविणारी बँक नाबार्डचे विभागीय कार्यालय नागपूर येथे सुरू करावे, अशी मागणी शिवसेना नेते व रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.
यासंदर्भात कृपाल तुमाने यांनी एक पत्र केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन, वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, नाबार्डचे अध्यक्ष व रिजर्व बँकेचे गर्वनर यांना पाठविले आहे. खासदार कृपाल तुमाने म्हणाले, विदर्भातील 11 जिल्हे व मराठवाड्यातील 8 जिल्हे मागास आहेत. पश्चिम महाराष्ट्र व मुंबई यांचा विकास तुलनेत जास्त आहे, यामागचे कारण तेथे असलेल्या सोयी व कार्यालये आहेत. मुंबई व पुणे येथे अनेक कार्यालये असल्याने तेथील संसाधने वाढली आहेत व विकास अधिक जोमाने झाला आहे. सध्या राज्यातील नाबार्डचे कार्यालय पुणे येथे असून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व लघु उद्योजकांना तेथे पोहचेने शक्य होत नाही. यामुळे नाबार्डच्या योज्नानांचा फायदा मिळत नसल्याचे खासदार कृपाल तुमाने यांनी निदर्शनास आणून दिले.
नागपूर येथे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्यास विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी व लघुउद्योजकांना फायदा होईल व विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करीत खासदार कृपाल तुमाने म्हणाले, सध्या अस्तीत्वात असलेल्या कार्यपध्दतीनुसार, नाबार्डच्या योजना कशा राबविल्या जातात याची कल्पना विदर्भातील लोकांना नाही. शिवाय नाबार्डचे अधिकारी कुठे असतात याची माहिती नसल्याने त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांना घेता येत नाही. यामुळे आर्थिक मागासलेपण कायम आहे. नाबार्डचे प्रादेशिक कार्यालय सुरू करावे यासाठी सर्व स्तरावरून पाठपुरावा सुरू असून लवकरच त्याला यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काय आहे नाबार्डचे काम
नाबार्डचे काम ग्रामीण परिक्षेत्रात विशेतीक्षेत्र, लघुउद्योग, ग्रामीण व कुटीरोद्योग, हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकायार्साठी वित्तपुरवठा करण्याचे आहे. याशिवाय शेतीक्षेत्राशी व ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित व मध्यवर्ती सरकारची मान्यता असलेल्या कोणत्याही संस्थेला व राज्य सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँका, भूविकास बँका इत्यादींना अल्प मुदत, मध्यम व दीर्घमुदतीची कर्जे नाबार्डच्यावतीने दिली जातात ज्यामुळे विकासाला चालना मिळते.
ग्रामीण विकासाची शिखर संस्था
देशातील ग्रामीण भागाचा विकास होऊन ग्रामीणांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी यासाठी नाबार्डची स्थापना 1981 साली करण्यात आली. ग्रामीण परिक्षेत्रात विकासात्मक पतपुरवठा करणाºया सर्व वित्तीय संस्थाची शिखर संस्था म्हणून काम करणे हे या बँकेचे मुख्य काम आहे. 3 लाख कोटीहून अधिक उलाढाल करणारी नाबार्ड 12 हजार कोटि रुपयांच्या भांडवलासह संपूर्णपणे सरकारी नियंत्रणात आहे. मुंबई येथील मुख्यालयासह देशातील 28 शहरांत नाबार्डचे प्रादेशिक कार्यालय असून एक उपकार्यालय आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).