Home Maharashtra Maharashtra । मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी: चौघांना अटक

Maharashtra । मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी: चौघांना अटक

कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे 100 कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या टोळीने 3 ते 4 आमदारांना गळाला लावल्याची माहिती असून त्यातील एक पुणे जिल्ह्यातील आमदार असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.

राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकिय निवासस्थान ‘सागर’ आणि ‘नंदनवन’कडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन, तीनवेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी 100 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली.

मंत्रिमंडळात सहभागासाठी आरोपीनी प्रथम 90 कोटी रुपये मागितले. त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या म्हणजेच 18 जुलैला द्यावे लागतील, असे आमदारांना सांगितले. आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ओबेरॉय हॉटेलमध्ये नेले. याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्यावेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपींची नावे समोर आली

एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपी रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय 57, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय 37, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय 53, नागपाडा, मुंबई) या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

 

Previous articleखादी और ग्रामोद्योग आयोग (KVIC) के नए अध्यक्ष मनोज कुमार ने पदभार ग्रहण किया
Next articleMaharashtra । विदर्भात पूरस्थिती, कोकण नियंत्रणात; चंद्रपूर जिल्ह्यात हजारो नागरिकांचे स्थलांतर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).