Home मराठी राँगसाइडने आलेल्या बाइकस्वारांना वाचवताना 100 फूट नर्मदेत पडली एसटी; 12 ठार

राँगसाइडने आलेल्या बाइकस्वारांना वाचवताना 100 फूट नर्मदेत पडली एसटी; 12 ठार

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सोमवारी सकाळी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात नर्मदा नदीत कोसळल्यामुळे चालक आणि वाहकासह किमान 12 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी प्रवासी बुडाले आहेत का, याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत घेण्यात येत होता. मृतांमध्ये चार महिला आणि नऊ पुरुष आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाच, धुळे जिल्ह्यातील दोन प्रवासी असून चार राजस्थानातील, तर एक मध्य प्रदेशातील आहेत. चालक आणि वाहक हे दोघेही अमळनेर येथील रहिवासी आहेत.

अमळनेर ते इंदूर या प्रवासासाठी ही बस (एमएच 40 एन 9848)रविवारी अमळनेर येथून निघाली होती.अमळनेर ते इंदूर या प्रवासासाठी ही बस (एमएच 40 एन 9848)रविवारी अमळनेर येथून निघाली होती. सोमवारी सकाळी ती इंदूरच्या सरवटे बस स्थानकातून सकाळी 7.25 वाजता अमळनेरकडे रवाना झाली. अपघात घडला त्या ठिकाणाच्या पाच किलोमीटर आधी मधुबन नावाच्या हाॅटेलवर ती काही वेळ थांबली. त्यानंतर 10 वाजेच्या सुमारास खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर नर्मदा नदीवर असलेल्या संजय सेतूवर बस चालकाने समोरच्या वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. इंदुरहून मुंबईकडे जाण्यासाठी हा एकमार्गी वाहतुकीचा पूल आहे. त्यामुळे समोरून वाहन येईल याची शंकाही चालकाला आली नाही. मात्र, वाहनाला ओलांडून पुढे वेगाने जात असताना अचानक मोटरसायकलस्वार समोर आले.

त्यामुळे त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालक चंद्रकांत एकनाथ पाटील यांचे बसवरील नियंत्रण सुटले. या पुलावर पादचाऱ्यांसाठी एक फूट उंचीचा पदपथ आहे. त्यावर चढून तीन फूट उंचीच्या कठड्यांना तोडून बस खाली कोसळली. पडताना तिचे छत खाली आणि चाके वर झाली. जिथे ही बस नदीत पडली तिथे पुलाचा मध्यवर्ती खांब आणि त्याचा सिमेंटमध्ये बांधलेला पाया आहे. त्यावर बस उलटी पडल्यामुळे ती अक्षरश: चोळामोळा झाली. त्यानंतर ती नदीच्या पाण्यात कलंडून बुडाली, असे मगरखेडी येथील रहिवासी आणि घटनेचे साक्षिदार प्रकाश शर्मा यांनी ‘दिव्य मराठी’ चमूला सांगितले. ते पुलावरून या बसच्याच मागे मोटरसायकलने जात होते. बसमधील एकही प्रवासी वाचला असण्याची शक्यता नाही, असे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तीन सरकारांकडून मदत

या अपघातात मृत झालेल्यांच्या नातलगांना महाराष्ट्र सरकारतर्फे 10 लाखांची तर मध्यप्रदेश सरकारतर्फे 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान सहायता निधीतूनही प्रत्येक मृतासाठी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच खरगोन आणि खार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारीही तातडीने तिथे पाहोचले. राज्याचे आणि केंद्राचेही आपत्ती व्यवस्थापन पथकही तिथे पाहोचले. त्यांनी काही तासातच 13 मृतदेह बाहेर काढले. बसमध्ये अधिक प्रवासी असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे सायंकाळी अंधार पडेपर्यंत नदीपात्रात शोधकार्य सुरू हाेते.

  1. प्रकाश श्रावण चौधरी, बस वाहक, (40, अमळनेर)
  2. चंद्रकांत एकनाथ पाटील, बस चालक (45, अमळनेर)
  3. अविनाश संजय परदेशी (24, पाडळसरे, ता. अमळनेर)
  4. निंबाजी आनंदा पाटील (60, रा. पिळोदा, ता. अमळनेर)
  5. विशाल सतीश बेहरे (33, रा. विरदेल, ता. शिंदखेडा, जि. धुळे)
  6. कल्पना विकास पाटील, (57, रा. बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे)
  7. आरवा मुर्तुजा बोहरा (27, मूर्तिजापूर, अकोला, माहेर-अमळनेर)
चालक-वाहकाची जोडी

अपघातात मृत झालेले बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी यांची जोडी कायम लांब पल्ल्याच्या रूटवर जायची. शुक्रवारी हीच बस (एमएच 40 एन 9848) घेऊन दोघे इंदूर येथे गेले होते. यानंतर 16 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता ते अमळनेर येथे परतले. अमळनेर ते इंदूर हा एका बाजूने सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास आहे. 16 जुलै रोजी परतल्यानंतर बसचे मेंटेनन्स करण्यात आले. दोषमुक्त असल्यामुळे शनिवारी (17 जुलै) सकाळी 9.30 वाजता पुन्हा पाटील व चौधरी यांची जोडी अमळनेर ते इंदूर मार्गावर हीच बस घेऊन गेले हाेते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करून ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटना अत्यंत दु:खदायक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत.

चौकशी समिती : या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्र सरकारही होते सतत संपर्कात : अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकारशी सतत संपर्क ठेवला. फडणवीस यांनी व्हिडिओ काॅल करून घटनास्थळाची पाहणी तर केलीच, मात्र आमदार गिरीश महाजन यांना तातडीने घटनास्थळी जायला सांगण्यात आले. ते विमानाने इंदूरला आणि तिथून घटनास्थळी गेले.

नियंत्रण कक्ष स्थापन : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला. या कक्षाचा क्रमांक 02572223180 आणि 02572217193 असा आहे.