Home मराठी Maharashtra । संततधार कायम:राज्यात पुराच्या पाण्यात 13 जण गेले वाहून, 5 जिल्ह्यांना...

Maharashtra । संततधार कायम:राज्यात पुराच्या पाण्यात 13 जण गेले वाहून, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

दोन दिवस मुसळधार बरसल्यानंतर राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला. परंतु, मराठवाड्यातील बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांमध्ये संततधार कायम आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर, नंदुरबार, पालघर जिल्ह्यांतील धरणे, बंधारे, तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात पाणी वाहत असूनही चालकाने गाडी पुलावर घातल्याने मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील ६ जण वाहून गेले. तर, नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एका ६ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जण तर नंदुरबार जिल्ह्यात दोन महिला वाहून असे गेल्या. गेल्या २४ तासांमध्ये पावसामुळे मुंबई उपनगरात दोन तर गडचिरोलीत एक बळी गेला आहे.

मराठवाड्यात मंगळवारी नांदेड जिल्ह्याला अधिक फटका बसला. येथे किनवट-हिमायतनगर महामार्ग चार तास बंद झाला होता. गोदावरी, आसना, लेंडी आदी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. उस्मानाबाद, बीड व परभणी जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू होता. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

औरंगाबाद जिल्ह्यात घाटनांद्रा परिसरात सलग पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावर असलेल्या घाटात सोमवारी सकाळी दरड-झाडे कोसळल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, ओडिशामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढली असून ते दक्षिण ओडिशाकडे सरकले आहे. समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर त्याचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील घाटमाथा तसेच विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट जाहीर केला आहे.

कोल्हापुरात दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ३४ फूट ३ इंचांपर्यंत गेली. राधानगरी धरण क्षेत्रात पाणीपातळी ३२३.५३ फूट आहे. तेथून १३५० दलघमी वेगाने विसर्ग सुरू आहे.

गुजरातमधील डांग जिल्ह्यात सापुतारा माळेगाव घाटात सोमवारी दरड कोसळली. मंगळवारी सकाळी १० वाजता पुन्हा चार ठिकाणी दरड कोसळल्याने गुजरात राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या
११ बसेस बोरगाव-सुरगाणा-वघई मार्गाने वळवण्यात आल्या. यामुळे गुजरात-नाशिक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

नवापूर तालुक्यातील पाच मंडळांत ११५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील नागण, भरडू, सुसरी, विसरवाडी, आंबेबारा, खोलघर, ढोंग, धनबारा, दरा ही नऊ धरणे व भुरीवेल लघु प्रकल्प १०० टक्के भरला आहे.