Home Maharashtra महाराष्ट्र चिंब । अनेक घाटांत दरडी कोसळल्या, राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट,...

महाराष्ट्र चिंब । अनेक घाटांत दरडी कोसळल्या, राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, एनडीआरएफ ची पथके तैनात

जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये सर्वदूर हजेरी लावली आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे बंधाऱ्यांत मोठा जलसंचय झाला आहे. तथापि, जीवित व वित्तीयहानीही होत आहे. हवामान विभागाने गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर अशा डझनावर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनही सज्ज असून अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान विभागाने सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांसाठी औरंगाबादसह जालना जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नांदेडमध्येही अशीच स्थिती असेल.

राज्यात गडचिरोलीसह नागपूर, नाशिक, नांदेड जिल्हा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात पावसाचा जोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा १४ जुलैपर्यंत संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यामध्ये पावसाची उघडझाप होत असली, तरी सोमवार सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरपरिस्थितीची पाहणी करण्याकरिता गडचिरोलीत दाखल झाले आहेत. खराब हवामानामुळे त्यांना नागपूरहून हेलिकॉप्टरऐवजी रस्ते मार्गाने गडचिरोलीला जावे लागले. गडचिरोली जिल्ह्यात २४ तासांत ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथील नदी, ओढ्यांना पूर आला आहे. आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गडचिरोलीला पुढील २ दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुढील ३ दिवस शाळा आणि कॉलेजला सुटी जाहीर केली. भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र अंबोलीत १६० ते १८० मिमी पाऊस झाल्याने धरण ६७ टक्के भरले असून सोमवारी १० हजार ३५ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला. होळकर पुलाखाली १३४२३ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. रामसेतू बुडाला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६८.४ मिमी इतका पाऊस झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (ता. खेड) मंदिर परिसरात सोमवारी दोन ठिकाणी दरड कोसळली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. पहिली घटना सकाळी तर दुसरी दुपारी घडली. पहाटे ३ वाजता पोखरी घाटात दरड कोसळल्याची माहिती सा.बां. विभागाचे अधिकारी सुरेश पठाडे यांनी दिली. या दोन घटनांमुळे घोडेगाव-भीमाशंकर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

नागपुर एमआयडीसी परिसरातील नाल्याच्या पुरात आई व मुलगी वाहून गेली. सुमधा मात्रे व अर्चना मात्रे अशी मृतांची नावे आहेत. १ किमीवर आईचा मृतदेह सापडला होता, तर मुलीचा शोध सुरू होता. भीमनगरमधून मधोमध जाणाऱ्या उताराच्या रस्त्यात रात्री पावसाचे पाणी साचले होते. रात्री दोघी मायलेकी घरी जात असताना नाल्याच्या पाण्यात घसरल्याने दोघी वाहून गेल्या.

कन्नड घाटात छाेट्या महादेव मंदिराजवळ साेमवारी सकाळी दरड कोसळल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट खाेल दरीत कोसळला. कन्नड घाटात मेणबत्ती पॉइंटजवळ ही घटना घडली. सकाळी अर्ध्या तासाच्या अंतरात या दाेन्ही घटना घडल्या.

Previous articleश्रीलंकेत संकट । अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात होते राष्ट्रपती राजपक्षे यांचे बंधू, विमानतळ कर्मचाऱ्यांचा राग पाहून परतले
Next articleJEE Exam । 14 टॉपर्समध्ये फक्त 1 मुलगी, 7 आंध्र-तेलंगण विद्यार्थ्यांचा समावेश, जेईई मेन्स सेशन-1 चा निकाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).