Home मराठी इंडिगोला झटका । एअर इंडियाच्या मुलाखतीसाठी अनेक कर्मचारी रजेवर; 55 टक्के विमानांना...

इंडिगोला झटका । एअर इंडियाच्या मुलाखतीसाठी अनेक कर्मचारी रजेवर; 55 टक्के विमानांना विलंब

‘इंडिगो’च्या ५५% विमानांना शनिवारी विलंब झाला. केबिन क्रू स्टाफच्या अनेकांनी वैद्यकीय रजा घेतल्याने ही घटना घडली. शनिवारी एअर इंडियातील भरतीसाठी मुलाखत होती. इंडिगोचे अनेक कर्मचारी एकाच वेळी वैद्यकीय रजा घेऊन मुलाखत द्यायला गेले होते. इंडिगो रोज देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय अशी एकूण १,६०० विमाने ऑपरेट करते.

हवाई वाहतूक मंत्रालयानुसार, शनिवारी इंडिगोची ४५.२% विमानेच तर एअर इंडियाची ७७.१%, स्पाइसजेटची ८०.४%, विस्ताराची ८६.३%, गो फर्स्टची ८८% आणि एअर आशिया इंडियाची ९२.३% विमानेच वेळापत्रकानुसार संचालित झाली. एअर इंडियाचे २७ जानेवारीला टाटा समूहाकडे औपचारिक हस्तांतरण झाले होते. नवीन विमाने खरेदी करण्याची आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची योजना कंपनी तयार करत आहे. याच संदर्भात कंपनीने केबिन क्रूच्या भरतीची मोहीम सुरू केली आहे.