Home मराठी डॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…

डॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…

नागपूर ब्युरो : सध्या भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेले पत्र खूपच वायरल होत आहे. या पत्राची चर्चा राजकीय वर्तुळात जशी होत आहे तशीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर सुद्धा हे वेगाने पसरत आहे. आमदार डॉ. परिणय फुके नेमके काय म्हणाले? त्यांनी या पत्रात नेमकं काय लिहिलं? हे आपण सुद्धा जाणून घेऊ इच्चीत असाल. म्हणूनच “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” सदर पत्रच इथे प्रकाशित करीत आहे.


देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला

मा.श्री देवेंद्र भाऊ, 

तुमचं व्यक्तिमत्व आमच्यासाठी नेहमीच आदर्श राहिलं आहे. तुमचे निर्णय अनेकदा आम्हाला संभ्रमात टाकत असतात. अनेकदा या निर्णयाची संगतीसुद्धा आम्हाला लागत नाही. अनेकदा आम्ही अस्वस्थ देखील होतो. परंतु तो निर्णय किती महत्त्वाचा असतो याची प्रचिती आम्हाला नंतर येत असते.

आपण काल घेतलेला एक राजकीय निर्णय असाच आम्हाला संभ्रमात टाकणारा, काहीसा अस्वस्थ करणारा होता. चालून आलेलं मुख्यमंत्रीपद एकाच क्षणात तुम्ही मा. एकनाथ शिंदे यांना दिलं आणि स्वतः मात्र पदाचा त्याग केला. कुठलेही पद मी स्वीकारणार नाही आणि मंत्रिमंडळात राहणार नाही, फक्त बाहेरून पक्षासाठी आणि राज्यासाठी या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांना मदत करेन अशी भूमिका आपण घेतली.

आपण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही सगळे संभ्रमात पडलो होतो. महाराष्ट्रात खळबळ माजली होती. परंतु आपण घेतलेला निर्णय हा पक्षहिताचा होता. ‘आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी‘ अशी आपल्या भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे. परंतु या भूमिकेचं पालन सगळे करतातच असे नाही आणि ते केलंच पाहिजे हा कुणाचा आग्रहही नसतो. भाजपा मध्ये घराणेशाही नाही. पक्षात जातीयवाद नाही. या पक्षात इतर पक्षाप्रमाणे नेतृत्वसुद्धा लादलं जात नाही. आपण अत्यंत परिश्रमातून, संघर्षातून कमी वयात एवढी मोठी पदं गाठली आणि जेव्हा असेच एक सर्वोच्च पद पुन्हा आपल्या वाट्याला येत आहे हे माहीत असूनही आपण एका क्षणात पक्षाचे हित डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्रीपद नाकारलं. आपण निर्णय घेतला की, मी मुख्यमंत्री होणार नाही, पक्षासाठी काम करत राहणार. परंतु तुमचे मंत्रीमंडळात असणे महाराष्ट्राच्या विकासासाठी, पक्षासाठी किती गरजेचे आहे हे पक्षाला जाणवले आणि पक्षाने आपणास आदेश दिला. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून आपण एका क्षणात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं.

आपल्या मनाचा मोठेपणा काल अवघ्या दोन तासात अख्या महाराष्ट्राने पाहिला. यात काही लोक राजकारण शोधतील. काही लोक वेगवेगळे अर्थ काढतील. पण एक गोष्ट नक्की की, आपण भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात आपण वाढलेले आहात. काल आपण घेतलेले निर्णय ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व शेवटी स्वत:’ हे संस्कार अधोरेखित करतात.
तुम्ही केलेला हा त्याग अमूल्य आहे. आमच्यासारख्या लहान माणसांना त्या त्यागाचा अर्थ समजत नाही. परंतु नंतर जेव्हा लक्षात येते तेव्हा आपले मोठेपण आमच्या लक्षात येते.

मी लहानपणापासून आपला कार्यकर्ता आहे. राजकारणात आपणच मला आणलं, आपणच मोठं केलं, आपल्यामुळेच मोठ्या पदांवर बसण्याची संधी मला मिळाली. काल संपूर्ण महाराष्ट्राने आपला मोठेपणा, आपला त्याग पहिला. काल-परवापर्यंत लोक आपल्यावर वेगवेगळे आरोप करीत होते, आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करत होते. ‘‘हा माणूस सत्तेसाठी हपापला आहे. हा माणूस मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षाचे सरकार आणत आहे. ‘‘ परंतु या सगळ्या आरोपांना आपण न बोलता आपल्या कृतीतून उत्तर दिलं.

२०१९ मध्ये अशीच एक संधी पुन्हा आपल्याला चालून आली होती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येणार असं वाटत होतं. महाराष्ट्राच्या जनतेने तसा कौलही दिला होता. परंतु शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी उभी केली. खरंतर आपल्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होता. आपल्याशी दगाफटका केला होता. त्याचे वैषम्यही आपण वाटू दिले नाही. अतिशय मोठ्या मनाने तो निर्णय स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या सेवेत राहिलात. कोरोनाचा काळ असेल, पूर परिस्थिती असेल, प्रत्येक वेळी आपण महाराष्ट्राच्या जनतेसाठी धावून आलात. तुमचा हा मोठेपणा आणि कामाची धडाडी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न जनतेसमोर आणले आणि सरकारला जेरीस आणले.

राजकारण गढूळ झाले, राजकारण चांगल्या माणसांसाठी नाही, असे सांगितले जाते. हे राजकारण किती वाईट आहे याचे अनुभव सर्वसामान्य लोकांना येत असतात. कालच्या आपल्या निर्णयामुळे राजकारण व समाजकारण सर्वांसाठी खुले आहे, हा संदेश दिला. राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांना एक नवा आदर्श आपण घालून दिला.

देवेंद्र भाऊ, आपलं अभिनंदन करत असताना आपण मुख्यमंत्री झाला नाहीत, याचे दुःख आम्हाला आहे. परंतु आपल्या या निर्णयामुळे पदापेक्षाही मोठा मान-सन्मान, प्रतिष्ठा आपण मिळवली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात घर केलं. आपल्याबद्दलची आत्मीयता, आपल्याबद्दलचा जिव्हाळा हा महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण केलात. म्हणूनच तुम्हाला माझा मानाचा मुजरा…!!

आपला नम्र
डॉ. परिणय फुके

Previous articleMaharashtra । शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री
Next articleनाना पटोले । खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व रोख मदत द्या
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).