Home मराठी स्वाभिमान सभा । भाजपच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशावर माफीची वेळ; पंतप्रधानांचे फोटो कचराकुंडीवर...

स्वाभिमान सभा । भाजपच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशावर माफीची वेळ; पंतप्रधानांचे फोटो कचराकुंडीवर : उद्धव ठाकरे

‘इतर धर्मीयांचा द्वेष करणे हे आमचे हिंदुत्व नाही. भाजपच्या प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अपमान केला. त्यामुळे जगभर आपली निंदा झाली. आखाती देशांनी भारताला माफी मागायला भाग पाडले. आपल्या पंतप्रधानांचा फाेटाे कचराकुंडीवर लावण्यात आला. चूक भाजपने करायची अन‌् त्याची शिक्षा देशाला हे आम्हाला मान्य नाही. भाजप नेते नेहमीच हिंदुत्वावर बोलतात. एकदा समोरासमोर येऊन हिंदुत्वासाठी त्यांनी काय केले व आम्ही काय केले याचा सोक्षमोक्ष लावून टाकू,’ असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर बुधवारी सायंकाळी उद्धव ठाकरेंची ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. या सभेला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर लाेक आले होते. धार्मिक मुद्द्यावर ठाकरे म्हणाले, ‘बाळासाहेबांनी कधीही आम्हाला मुस्लिमांचा मुसलमान म्हणून द्वेष करा, त्यांनाझोडा असे सांगितले नाही. धर्मावर राजकारण करणे आमचे हिंदुत्व नाही. मात्र, जर कुणी आमच्या अंगावर आला तर देशाभिमानी हिंदू म्हणून आम्ही त्याला सोडणार नाही. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिक नव्हते असे फडणवीस सांगतात.

मात्र जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाजपची पळापळ झाली. शिवसेनाप्रमुखांनी मात्र त्याच वेळी जबाबदारी घेतली. काश्मिरी पंडितांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. आजही काश्मिरात पंडितांवर हल्ले होत आहेत, मात्र त्यांचे संरक्षण करण्यास कुणीही पुढे येत नाही. मात्र बाळासाहेबांचा मुलगा म्हणून व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी सदैव तयार आहे, अशी ग्वाही ठाकरेंनी दिली. हनुमान चालिसा म्हणून हिंदुत्व सिद्ध करणाऱ्यांनी काश्मिरात जाऊन पठण करावे, असा टाेलाही त्यांनी लगावला.

मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत

मध्यंतरी मी संघाबद्दल बोललाे, पण टीका केल्याचा आरोप झाला. भाजपच्या सभेला हे लाेक भगव्या टाेप्या घालून येतात. भगव्या टाेप्या घालून हिंदुत्व सिद्ध होत असेल तर मग संघ काळ्या टाेप्या का घालतो, असे मी विचारले. संघ त्यांची मातृतसंस्था आहे. तुम्ही जे काही शिकवत आहात ते तुमचीच कार्टी (भाजप) समजून घेत नाहीत. त्यांच्या कानाखाली वाजवण्याचा अधिकार मातृसंस्थेला अहे. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शाेधू नका हे सांगितले, ते योग्यच झाले. नाही तर निवडणुका आल्या की भाजपचे लाेक धर्माची अफूची गाेळी देऊन मते मिळवतात, असा आरोपही ठाकरेंनी केला.

Previous articleराजपथने रचला इतिहास । १०९ तासात ८४.४०० किमी बिटूमीनस काँक्रीट पेविंगचा केला विश्वविक्रम
Next articleकोरोना । मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरवू : डीजीसीए
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).